ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चीन आणि भारत यांच्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण होतेय; राजकीय पक्षांनी राजकारण न आणता सामूहिक भूमिका घेण्याची गरज – शरद पवार

मुंबई दि. १३ ऑक्टोबर – देशाच्या सीमेचा थोडाबहुत अभ्यास आहे. गेले काही महिने चीनसोबत आपली चर्चा सुरु आहे. काल त्यांची १३ वी बैठक झाली. ती अपयशी ठरल्याची माहिती आहे. एका बाजुला चीनशी संवाद अपयशी ठरत आहे. दुसऱ्या बाजूला पुंछ येथे प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. सतत घडतंय हे चिंताजनक आहे.यावर राजकारण न आणता एकत्र बसून सर्व राजकीय पक्षांनी सामूहिक भूमिका घेण्याची गरज आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एनसीबी, ईडी, आयकर विभाग या यंत्रणांवर भाष्य केलेच शिवाय लखीमपूर हिंसाचारात युपी सरकारवर निशाणा साधला तर बंदमध्ये सहकार्य केलेल्या राज्यातील जनतेचे आभार मानले आणि पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली.

कालच्या प्रकारातून पुढचा निकाल घेण्याची आवश्यकता वाटते. यात कलेक्टिव्ह लाईन कशी घेता येईल तसेच देशातील सर्वसामान्य लोकांना एकत्रित करून सतर्क करता येईल, याचा प्रयत्न करावा लागेल असेही शरद पवार म्हणाले.

केंद्रसरकार काही इन्स्टिट्यूशनचा गैरवापर करण्याची पावले सतत टाकत आहे. सीबीआय, आयकर विभाग, ईडी, एनसीबी असेल. या सगळ्या यंत्रणांचा वापर राजकीय हेतून केला जात असल्याचे दिसून येत आहे. काही उदाहरणे सांगायची झाल्यास, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी काही आरोप केले. त्यातून वातावरण निर्मिती झाली. ज्यांनी आरोप केले, ते गृहस्थ आज कुठेही दिसत नाही. एक जबाबदार अधिकार बेछूटपणे आरोप करतो, असे कधी दिसले नव्हते. अनिल देशमुख यांनी आरोप झाल्यानंतर तात्काळ पदावरुन दूर जाण्याची भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला परमवीरसिंग यांच्यावर आता आरोपांची मालिका सुरु झाली आहे. हे आरोप होत असताना परमवीरसिंग गायब झाल्याचे दिसते.अनिल देशमुख यांच्या घरावर काल पाचव्यांदा छापा पडल्याचे कळले. पाच – पाच वेळेला एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला याचा अर्थ हा विक्रमच त्यांनी केला असा मिश्किल टोला शरद पवार यांनी लगावला.

दुसऱ्या बाजूला उत्तरप्रदेशच्या लखीमपूर येथील घटनेची माहिती बाहेर आली. सुदैवाने त्याचे व्हिडिओही समोर आले. शांतपणे चाललेल्या शेतकऱ्यांना काही लोक गाडीची धडक देतात, त्यातून हिंसा भडकून तीन-चार लोकांची दुर्दैवाने हत्या झाली. असा प्रकार दुर्दैवाने कधी घडला नव्हता. ही घटना घडल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा चिरंजीव त्याठिकाणी उपस्थित होता. उत्तरप्रदेश सरकारने मात्र हा दावा फेटाळून लावला. सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीवर जरी आरोप असला तरी सत्ताधारी पक्षाने यात काहीतरी भूमिका घेण्याची आवश्यकता होती. मात्र सत्ताधाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेणे, अपराध्यावर कारवाईची उपाययोजना न करणे ही जबाबदारी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही. तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी देखील पदावर राहता कामा नये, त्यांनी तात्काळ पदावरुन दूर व्हायला हवे अशी मागणीही शरद पवार यांनी केली.

लखीमपूरचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. मावळच्या घटनेचा उल्लेख केला गेला. मावळ येथे शेतकऱ्यांच्या मृत्यूला राज्यकर्ते नाही तर पोलीस जबाबदार होते. त्या घटनेलाही बराच काळ उलटून गेला आहे. तरीही माजी मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा उल्लेख केला. मावळचे चित्र आज बदलले आहे. ज्यांच्यावर त्यावेळी मावळवासियांनी आरोप केले होते, त्यांचा या घटनेत काहीही हात नसल्याचे लक्षात आले. उलट भाजपच्या काही नेत्यांनी भडकावल्यामुळे त्याकाळी स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मावळ तालुक्यात जनसंघ आणि नंतर भाजपचे वर्चस्व होते. रामभाऊ म्हाळगी हे मावळचे लोकप्रतिनिधी होते. आज मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके हे ९० हजार मताधिक्याने निवडून आलेले आहेत. फडणवीस यांनी मावळचा उल्लेख केला ते बरं केले, कारण त्यांना आजची मावळची परिस्थिती काय आहे हे समजून घेतले तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून काही लोकांना बदनाम केले जात आहे. नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर काही गोष्टी मांडल्या आहेत. मीही काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या प्रदिर्घ संसदीय अनुभवामुळे प्रशासनाची मला जाण आहे. सत्तेत आणि विरोधात काम करत असताना प्रशासनाशी आमचा सुसंवाद असतो. सत्तेचा उन्माद आम्ही कधी केला नाही.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले. याआधी ते विमानतळावर कार्यरत होते, तिथल्याही काही कथा माझ्यावर कानावर आल्या. मात्र त्यावर मी आताच भाष्य करु इच्छित नाही. एनसीबीने गेल्या काही वर्षात जप्त केलेले अंमली पदार्थाची क्वाटिंटी अतिशय कमी आहे. याउलट महाराष्ट्राच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कितीतरी अधिक पटीने अंमली पदार्थ जप्त केले आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा फक्त केंद्राला माहिती देण्यापुरती काही जप्तीची कारवाई करते की काय? अशी शंका शरद पवार यांनी व्यक्त केली.

तसेच गोसावी नामक एका व्यक्तीला पंच म्हणून एनसीबीने घेतले आहे. प्रशासनाने केलेली कारवाई योग्य आहे, हे दाखविण्यासाठी चांगल्या कॅरेक्टरची माणसे पंच म्हणून घेतले जातात. पंच म्हणून घेतलेला व्यक्ती फरार आहे. याचा अर्थ या पंचाची इंटेग्रिटी संशयास्पद आहे. याच्यापेक्षाही गंभीर गोष्ट म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीची पंच म्हणून निवड केली त्या अधिकाऱ्यांचे संबंध कुठल्या वर्तुळाशी आहेत, हे दिसून आले.

आता एखाद्या यंत्रणेवर आरोप केल्यानंतर संबंधित यंत्रणा बाजू मांडण्यासाठी पुढे येत असेल तर ठिक आहे. पण भाजपच सर्वात पुढे येऊन बाजू मांडताना दिसते. हे सर्वांसाठीच नवीन आहे. एखाद्या यंत्रणेकडून गैरवापर होत असेल तर त्यांची बाजू मांडण्यासाठी भाजपचे लोक पुढे येत आहेत, ही गंभीर बाब आहे असेही शरद पवार म्हणाले.

बाजू मांडणाऱ्यांमध्ये पुढे येणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आम्हाला एनसीबीचा अभिमान आहे. यंत्रणेचा अभिमान असणे ठिक आहे. पण कालच्या भाषणात त्यांनी सांगितले की, मी अजूनही मुख्यमंत्री असल्याचे वाटते. चांगली गोष्ट आहे त्यांना अजूनही सत्तेत असल्यासारखे वाटते.

माझा अनुभव वेगळा आहे. मुख्यमंत्री पदावर काम केल्यानंतर पुढच्यावेळी मी विरोधी पक्षात काम केले आहे. त्यावेळी प्रशासनाने सत्तेवर असताना आपल्याला दिलेले अहवाल आणि जमिनीवरची वास्तवता वेगळी असते. विरोधात असताना लोकांमध्ये फिरल्यानंतर त्याचा अभ्यास होतो असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

महाराष्ट्राच्या जनतेचे मला अंतःकरणापासून अभिनंदन करायचे आहे. ११ ऑक्टोबर रोजी लखीमपुरच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने बंद पुकारला होता. तो बंद यशस्वी झाला, याबद्दल शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत. तसेच जनतेलाही धन्यवाद द्यायला हवेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांची हत्या झाली, मात्र त्याची दखल महाराष्ट्रातील जनता घेते. ही चांगली गोष्ट आहे. मला उत्तरप्रदेशमधील काही सहकाऱ्यांचे फोन आले. उत्तरप्रदेशच्या घटनेबद्दल महाराष्ट्रातील लोक बंद पाळतात याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे शरद पवार म्हणाले.

पुढील १५ दिवसात महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरु होणार आहेत. यंदा पडलेला पाऊस पाहता यावेळी ऊसाचे रेकॉर्डब्रेक पिक घेतली जाईल, असा अंदाज आहे. आता काही लोकांनी मागणी पुढे केली आहे की, ऊसाला वन टाईम एफआरपी दिला पाहीजे. मागणी चांगलीच आहे. पण त्यासोबत वस्तूस्थितीही पाहिली पाहीजे. गुजरातमध्ये ऊस उत्पादकांना तीन हप्त्यात पैसे दिले जातात. महाराष्ट्रात एका कारखान्याने एक रकमी पैसे दिल्यानंतर सर्वांकडून ही मागणी सुरु झाली आणि तुकड्यात तुकड्यात पैसे न देता एकरकमी द्या, अशी मागणी पुढे येतेय. पण याचे अर्थकारण समजून घेतले पाहीजे. साखर कारखान्यांनी टप्प्या टप्प्याने साखर विकल्यानंतर मागणी व पुरवठा याचा रेशो टिकून राहतो. मात्र एकाच टप्प्यात सर्व साखरेचे उत्पादन काढले तर पुरवठा वाढल्यानंतर साखरेचे दर कोसळतील. जर कारखान्यांनी कर्ज काढून शेतकऱ्यांना पैसे जरी दिले तर ते कर्ज कसे फेडणार. यातून कारखाने कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. एकेकाळी मुंबईत मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या होत्या. त्यावेळच्या नेत्यांनी काही अतिरेकी मागण्या केल्या. आम्ही सांगत होतो की, ताणावं पण तुटेपर्यंत ताणू नये. पण ते ऐकलं गेलं नाही आणि आज मुंबईतील कापड व्यवसाय नामशेष झाला. तसा फटका साखर कारखान्यांना बसू शकतो अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान यातून बसून मार्ग काढू शकतो. कारखाने बंद करायला फारशी अक्कल लागत नाही तर सुरू करायला लागते असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

पाहुणचार घ्यावा पण अजीर्ण होईल, इतका पाहुणचार घेऊ नये. आज माझ्या मुलींच्या घरी सहा दिवसांपासून अठरा सरकारी पाहुणे बसलेले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनाही घरी जायचे आहे, पण त्यांना घरातून बाहेर पडण्याच्या सूचना वरून आलेल्या नाहीत. याआधी देखील केंद्रीय यंत्रणेनी घरी जाऊन चौकशी केलेली आहे. पण इतक्या दिवस ठाण मांडून बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. तरीही आमची याबाबत काही तक्रार नाही असेही शरद पवार म्हणाले.

सत्तेचा गैरवापर हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसवरच होतोय, असे नाही. इतरही पक्षांना याचा फटका बसला आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षे प्रयत्न करुनही पाडता आले नाही म्हणून नेत्यांच्या जवळच्या लोकांना टार्गेट केले जात आहे. सत्तेचा गैरवापर करायचा नाही हे संस्कार आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्याकडून घेतले आहेत असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

जालियनवाला बाग असा शब्द मी दिल्लीत लखीमपूर घटनेवर वापरला. दोन – तीन भाजप मंत्र्यांना वाईट वाटले त्यांचा फोन आले हे शब्द चांगले वापरले नाही. त्यानंतर हे पाहुणे घरी आल्याचे शरद पवार म्हणाले.

उत्तरप्रदेशमध्ये परिवर्तन करायचे असेल तर जो भाजप विरोधी पक्ष तिथे सर्वात ताकदवान आहे, त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, अशी आमची भूमिका आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना आम्ही समर्थन देत आहोत. आम्हाला जागा कमी मिळाल्या तरी भाजपच्या पराभवात खोडा न घालण्याची आमची भूमिका आहे असेही शरद पवार यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली.

या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, माजी आमदार विद्याताई चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!