मूल्याधिष्ठित पत्रकारितेची गरज : सुनिल शिनखेडे,देऋब्राच्या ल.गो. काकडे स्मृती पत्रकार पुरस्काराचे वितरण
सोलापूर (प्रतिनिधी) – पत्रकारितेमध्ये व्यवसायिकपणा आलेला असला तरीही विचारांशी फारकत न घेता मूल्याधिष्ठित पत्रकारितेची आज गरज आहे. अशीच पत्रकारिता ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी करत आहेत, असे प्रतिपादन आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सहाय्यक संचालक सुनिल शिनखेडे यांनी केले.
येथील देशस्थ ऋग्वेदी ब्रााहृण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे देण्यात येणारा कल्पतरूकार कै. ल.गो. तथा तात्यासाहेब काकडे स्मृती पुरस्कार माजी संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांना शिनखेडे याच्या हस्ते सोमवारी संस्थेच्या समर्थ सभागृहात कोरोनाचे नियम पाळून झालेल्या मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोळकर होते. संंशोधनपर शिष्यवृत्ती म्हणून पाच हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष, कल्पतरू व आनंद वृत्त या साप्ताहिकाचे संपादक कै. ल.गो. तथा तात्यासाहेब काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या 14 वर्षापासून सोलापूर शहरातील उत्कृष्ट कार्य करणा-या पत्रकारास हा पुरस्कार देण्यात येतो. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष हरिभाऊ जतकर, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर उपस्थित होते.
शिनखेडे पुढे म्हणाले, पत्रकारिता करताना प्रत्येकाची विचाराशी बांधिलकी असते ती टिकवणे तितकेच महत्वाचे असते. अरविंद जोशी यांनी यांनी हि बांधिलकी टिकवून पत्रकारितेमधे एक वेगळा आदर्श मानदंड निर्माण केला आहे. निस्पृहता, त्याग, सचोटी, नैतिकता हि पत्रकारीतेची मुल्ये आहेत. या मुल्यांसाठी अनेक जण झटले आहेत. आता पत्रकरारितेत अनेक प्रवाह आणि नवनविन साधने निर्माण झाली आहेत. नविन आव्हाने येत आहेत. त्यामुळे पत्रकारांवर मुल्ये जपण्याची मोठी जबाबदारी आली आहे.
सत्काराला उत्तर देताना अरविंद जोशी म्हणाले, पत्रकारितेमधे थरार असतो. दुरून चांगली दिसणारी माणसे जवळून पाहिल्याने त्यांचे वेगळेच रूप लक्षात येते. त्यामुळे चांगलेपणावरील विश्वास उडून जातो. तसेच लांबून सामान्य दिसणारी माणसे मात्र जवळून पाहिल्यास त्यांच्यातील असामान्यत्व दिसून येते याचा अनुभव आपल्याला पत्रकारिता करताना आला. पत्रकार म्हणून काम करताना व्यक्तिमत्व विकासाची संधी मिळते. माझ्यामुळे समाज किती बदलला यापेक्षाही मी किती विकसीत झालो हेच मी पाहतो. अध्यक्षीय मनोगतात डॉ. चिंचोळकर म्हणाले, पोटार्थी आणि विधायक असे पत्रकारांचे दोन प्रकार सध्या दिसतात. विधायक पत्रकारितेमुळे समाज घडतो. पत्रकारितेत ताकद आहे पण व्यवसायिकरण झाल्याने त्यात आता बदल होत आहेत.
सत्कार व फेसबुक लाईव्ह प्रसारण
यावेळी शिनखेडे यांचा कविवर्य दत्ता हलसगीकर पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने हा कार्यक्रम पद्माकर कुलकर्णी यांच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह करण्यात आला. त्यामुळे अनेकांना या कार्यक्रमाचा लाभ घेता आला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रतिमापूजनाने झाली. संस्थाध्यक्ष प्रा.डॉ. येळेगावकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख उपस्थितांचा परिचय दत्तात्रय आराध्ये आणि शंकरराव कुलकर्णी यांनी करून दिला. प्रमुख कार्यवाह श्याम जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर सुशांत कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास सहकार्यवाह श्रीकांत तुळजापूरकर, कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.नभा काकडे, विजय कुलकर्णी, युवक अध्यक्ष सुनिल हरहरे, पद्माकर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
“कल्पतरू’ वर अभ्यासग्रंथ व्हावा : डॉ. चिंचोळकर
स्वातंत्र्यपूर्व काळातील एक प्रतिथयश असलेल्या साप्ताहिकाबाबत सोलापूरकरांना फारशी माहिती नाही. त्यामुळे या साप्ताहिकावर पत्रकारांनी अभ्यास करून “कल्पतरू’चा इतिहास, कार्य आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील त्याचे महत्व अधोरेखीत करणारा एखादा अभ्यासग्रंथ निर्माण करावा असे आवाहन डॉ. रविंद्र चिंचोळकर यांनी आपल्या मनोगतातून केले. एकवीस हजाराची देणगी जमा या कार्यक्रमा रविंद्र नाशिककर यांनी मातोश्री शोभना नाशिककर यांच्या स्मृतीप्रतियर्थे अकरा हजार रूपयांची तसेच अनिल कुलकर्णी यांनी आपले वडील सदाशिव कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दहा हजार रूपयांची देणगी संस्थेस दिली. यावेळी कवयित्री वंदना कुलकर्णी उपस्थित होत्या.