नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनी स्वत: ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. टोल टॅक्सजवळ ही घटना घडली. या घटनेच्या तक्रारीनंतर पोलीस टोल टॅक्सच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत आहेत.
कुछ देर पहले छिजारसी टोल गेट पर मेरी गाड़ी पर गोलियाँ चलाई गयी। 4 राउंड फ़ायर हुए। 3-4 लोग थे, सब के सब भाग गए और हथियार वहीं छोड़ गए। मेरी गाड़ी पंक्चर हो गयी, लेकिन मैं दूसरी गाड़ी में बैठ कर वहाँ से निकल गया। हम सब महफ़ूज़ हैं। अलहमदु’लिलाह। pic.twitter.com/Q55qJbYRih
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 3, 2022
ओवेसी पिलखुवा छिजारसी येथून निवडणूक रॅलीला संबोधित करून परतत होते. टोल टॅक्सजवळ हल्लेखोरांनी त्यांच्या ताफ्यावर गोळीबार सुरू केला. ओवेसी ज्या गाडीत बसले होते त्याचे टायरही पंक्चर झाले. या घटनेनंतर ओवेसी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांचा ताफा पिलखुआ येथे पोहोचला तेव्हा मोठा आवाज झाला. त्यानंतर चालकाने हल्ला झाल्याचे सांगितले. यानंतर पुन्हा तीन-चार वेळा गोळीबाराचा आवाज आला. आम्ही गाडी वेगाने पळवली, त्यादरम्यान आमच्या वाहनाच्या चालकाने हल्लेखोराला धडक दिली.
या हल्ल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती लोकसभा अध्यक्षांनाही देण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एका हल्लेखोराला पोलिसांनी अटक केल्याचा दावाही त्यांनी केला. घटनास्थळावरून हल्ल्यात वापरलेली शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.