पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सरासरी ६८ टक्के मतदान; राष्ट्रवादीचे भगीरथ भालके, भाजपचे समाधान अवताडे यांच्यासह १९ जणांचे भवितव्य मतपेटीत बंद
पंढरपूर, दि.१७ : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ६८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.मतदान शांततेत पार पडले.मतदान प्रक्रियेत भारत निवडणूक आयोग आणि आरोग्य विभागाने कोरोना विषयक दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले गेल्याची माहितीही त्यांनी दिली.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे भगीरथ भालके,भाजपचे समाधान आवताडे यांच्यासह १९ जणांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार होते.यापैकी सायंकाळी ५ पर्यंत १ लाख ९७ हजार ५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यात १ लाख ३ हजार ६४१ पुरुष तर ९३ हजार ४१४ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अंतिम अधिकृत आकडेवारी रात्री उशिरा कळणार आहे.आता निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.