मुंबई : गोरेगावात उत्तर भारतीयांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्व नाही व भाजप म्हणजे हिंदुत्व नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा जुना किस्सा सांगून म्हणाले की, जेव्हा वाईट दिवस होते, तेव्हा माझ्या वडिलांनी आज जे पंतप्रधान आहेत, त्यांना वाचवलं होतं. १९९५ पूर्वी शिवसेना आणि भाजपला कुणी साथ देत नव्हते, आमच्यावर धार्मिक असल्याचा ठपका होता. तेव्हा माझ्या वडिलांनी तत्कालीन पंतप्रधानांना पाठिंबा दिला होता. बाळासाहेबांनी कधीच उत्तर भारतीयांचा किंवा मुस्लिमांचा द्वेष केला नाही. जो देशाच्या विरोधात होता, त्यालाच बाळासाहेबांनी विरोध केला.
आम्ही युती तोडली, कारण २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमच्यासोबत युती तोडली होती. तेव्हा आम्ही हिंदू होतो, आजही आहोत आणि उद्याही हिंदूच राहू. आम्ही त्यांची साथ सोडली, पण आम्ही हिंदूत्व सोडलेले नाही. भाजप म्हणजे काही हिंदूत्व नाही. त्यांचे हिंदूत्व आम्हाला मान्य नाही. द्वेषाचे राजकारण ते करत आहेत, असे हिंदूत्व आम्हाला मान्य नाही.
भाजपसोबत आमची गेल्या २५ ते ३० वर्षांपासून युती होती, आम्ही प्रामाणिकपणे युती निभावली पण त्यांनी २०१४ मध्ये तोडली. आमची त्या पक्षासोबत आपुलकी होती, पण ते वर जाऊन बसले आणि त्यांनी आम्हाला दूर केले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.