ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भंडीशेगावचा प्रशांत ननवरे निबंध स्पर्धेत देशात दुसरा

सोलापूर – पंढरपूर तालुक्यातल्या भंडीशेगावच्या प्रशांत विजय ननवरे या विद्यार्थ्याने केन्द्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत देेशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाबद्दल सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला.

या सत्काराच्या वेळी यावेळी उपसरपंच संतोष ननवरे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश ननवरे, सावता ननवरे आणि वाघमारे गुरुजी हे उपस्थित होते. ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या या विद्यार्थ्याचे हे यश कौतुकास्पद आहे अशी भावना फाऊंडेशनचे सल्लागार प्रशांत वाघमारे यांनी या सत्कार प्रसंगी व्यक्त केली.

ंप्रशांत ननवरे हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संख्याशास्त्र व प्रगत अध्ययन केन्द्राचा विद्यार्थी आहे. गेल्या फेब्रूवारीत केन्द्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या वतीने या विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ही ऐन वेळी दिल्या जाणार्‍या विषयावरील निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत प्रशांत ननवरे याचा दुसरा क्रमांक आला. तो या स्पर्धेत विजयी झालेला महाराष्ट्रातला एकमेव विद्यार्थी आहे. शिवाय या स्पर्धेत २०१४ नंतर प्रथमच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याने हे यश मिळवले आहे.

बक्षिस विजेत्यांत अन्य विद्यार्थी तामिळनाडू, केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेश, प. बंगाल या राज्यातले आहेत.
प्रशांत ननवरे याचे प्राथमिक शिक्षण भंडीशेगावच्या जि. प. प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण पोखरापूर येथील नवोदय विद्यालयात झाले आहे. त्याने पदवीचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालातून घेतले असून तो आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्याला या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. आकांक्षा काशीकर आणि अन्य प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!