दिल्ली : झी एन्टरमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे विलिनीकरण होणार आहे. याबाबत झीच्या संचालक मंडळाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. विलिनीकरणानंतर अस्तित्वात येणाऱ्या कंपनीमध्ये सोनीकडून 11,605.94 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
झी एन्टरटेनमेन्टच्या झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये या कराराला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता झी एन्टरटेनमेन्ट आणि सोनी इंडियाच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. झी एन्टरमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्सच्या विलिनीकरण नंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या कंपनीचे सीईओ आणि व्यस्थापकीय संचालक पद हे पुनीत गोयंका यांच्याकडे येणार आहे. नवीन कंपनीमध्ये झी एन्टरमेंटकडे 47.07 टक्के हिस्सा असणार आहे. तर सोनी पिक्चर्सकडे 52.93 टक्के हिस्सा असणार आहे.
या विलीनीकरणाचा दोन्ही कंपन्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे, असं मत बोर्डने व्यक्त केलं आहे. या दोन्ही मोठ्या कंपन्या एकत्रित आल्याने एक नवीन उर्जा मिळेल आणि शेअर होल्डर्सना त्याचा लाभ होईल असंही बोर्डच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.