मुंबई : देशात जातीनिहाय जनगणना व्हावी ही मागणी वाढत आहे. यासंबंधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील सर्वपक्षीय दहा सदस्य नेत्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. यावेळी जातीनिहाय जनगणना संदर्भात पंतप्रधानांकडे मागणी केली आहे. या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणना संदर्भात लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचं नितीश कुमार यांनी सांगितले.
जातीनिहाय जनगणना ही प्रत्येक समाजाच्या हिताची आहे. या जनगणनेमुळे इतर समाजाला चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. ही जनगणना केंद्र सरकारवर अवलंबून आहे. मात्र, आम्ही आमच्या मागण्या पंतप्रधान मोदी यांच्यासमोर ठेवल्या आहेत, असं या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीश कुमार यांनी सांगितले.
देशातील अनेक पक्ष जातीनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि इतर पक्षांचे प्रमुख नेते जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. देशभरातून जातीनिहाय जनगणनेची मागणी होत असली तरी, अधिवेशनात संसदेच्या पटलावर गृहमंत्री अमित शाह यांनी देशात जनगणना होणार नाही असे स्पष्ट केले होते. जातीनिहाय जनगणनेमुळे इम्पिरिकल डेटा गोळा करायला मदत होईल. शिवाय ओबीसींचे अनेक प्रश्न त्यामुळे सुटतील असेही नवाब मलिक म्हणाले.