मुंबई : हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं म्हणणाऱ्या शिवसेनेवर भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी आज जोरदार टीका केली. मुख्यमंत्री कोणत्याच परीक्षेला बसले नाहीत. पिंजऱ्यात बसून आहेत. त्यांनी कामच केलं नाही. मग सर्टिफिकेट कसं देणार?, असा टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लगावला आहे.
पालघर हत्याकांडप्रकरण सीबीआयकडे सोपविण्याच्या मागणीसाठी भाजप नेते राम कदम यांनी जनआक्रोश रॅलीचं आयोजन केलं होतं. याप्रसंगी नारायण राणेही उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील विकास कामे ठप्प आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी एकही काम केलं नाही. घरातच बसून असतात. पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत. ठाकरे कोणत्याही परीक्षेला बसले नाहीत. बसत नाहीत. त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, असा टोला राणे यांनी लगावला.
‘शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही. हिंदुत्व ही उद्धव ठाकरेंची विचारसरणी नाही. ते तडजोड करणारे आणि पदासाठी हवं ते करणारे आहेत. शिवसेना व हिंदुत्व हे समीकरण जुळणारं नाही,’ असं राणे म्हणाले.
‘भाजपशी गद्दारी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून बसले, काँग्रेस-राष्ट्रवादीशी समझोता केला, तिथंच त्यांनी हिंदुत्व सोडलं. सर्वधर्म समभाववाल्यांसोबत गेलेल्यांकडून साधूसंतांच्या रक्षणाची अपेक्षा ह्यांच्याकडून काय करणार?,’ असा सवाल राणेंनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही त्यांनी टीका केली. ‘मागच्या एक वर्षात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काय काम केलं? कृषी, शिक्षण, कायदा-सुव्यवस्था कुठल्या क्षेत्रात काम केलं? फक्त पिंजऱ्यात बसतात आणि राम राम म्हणतात. म्हणूनच आमच्या राम कदमांना आंदोलन करावं लागतंय,’ असा चिमटाही राणेंनी काढला.