ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देगलूर पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकरा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. १४ टेबलर ३० फेऱ्यांची मतमोजणी झाली. अंतापूरकर यांना ३० व्या फेरी अखेर १ लाख ८ हजार ७८९ मते मिळाली. तर भाजपच्या सुभाष साबणे यांना ६६ हजार ८७२ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरील वंचितचे डॉ. उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४७ मते मिळाली. जितेश अंतापूरकर यांनी तब्बल ४१ हजार ९३३ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.

आपला विजय हा महाविकास आघाडीचा विजय असल्याचं जितेश अंतापूरकर यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. जनतेने मला भरभरुन प्रेम दिलं, त्यामुळे आपला विजय झाल्याचं जितेश अंतापूरकर यांनी म्हटलं आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळविल्यानंतर महाविकास आघाडीसमोर देगलूर – बिलोली पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. पंढरपूर पोटनिवडणुकीचा चमत्कार पुन्हा दिसावा यासाठी शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपने पक्षात घेत थेट निवडणूक रिंगणात उतरवले. तर कॉंग्रेसने स्व. रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश अंतापूरकर यांना तिकीट दिले.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात होते, पण मुख्य लढत काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडीत होती. काँग्रेसतर्फे जितेश अंतापूरकर, भाजपतर्फे सुभाष साबणे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात होते.

या निवडणुकीत ६४.९५ % इतकं मतदान झाल होतं. एकूण २ लाख ९८ हजार ५३५ मतदारांपैकी १ लाख ९० हजार ८०० इतकं मतदान झाले होते. कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी पहिल्या फेरीत १६२४ मतांची आघाडी घेतली. एकूण ३० फेऱ्यात अंतापूरकर यांनी आघाडी टिकवून ठेवत अखेर ४१ हजार ९३३ मतांनी विजय मिळवला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!