ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बसपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

बहुजन समाज पक्ष आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बसपाध्यक्ष मायावती यांनी सोमवारी स्पष्ट केले. आघाडीमुळे बसपला फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच राजकीय संन्यासाचे वृत्तही बसप प्रमुखांनी फेटाळून लावले. मायावतींच्या या निर्णयाचा प्रामुख्याने उत्तरप्रदेशसह काही राज्यांमध्ये आघाडीला फटका बसून भाजपला फायदा होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

आपल्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त बसप मुख्यालयावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मायावतींनी पक्षाची आगामी वाटचाल स्पष्ट केली. बसपने यापूर्वी उत्तरप्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवून सरकार स्थापन केले आहे. या अनुभवाच्या आधारावर आम्ही आगामी लोकसभा निवडणूक देखील स्वबळावर लढणार आहोत. दलित, आदिवासी, अतिमागास, मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाजाच्या बळावर बसप लोकसभेला स्वबळावर सामोरे जाईल, असे मायावती म्हणाल्या. आघाडीमुळे बसपला फायद्यापेक्षा नुकसानच होत असल्याचा दावाही त्यांनी केला. आघाडीसाठी अनेक पक्षांकडून आम्हाला विचारणा होत आहे. परंतु आघाडीत निवडणूक लढण्याबद्दल आम्हाला आलेला अनुभव चांगला नाही.

बसपचे नेतृत्व एका दलित महिलेच्या हाती आहे आणि दलितांबाबत इतर पक्षांची जातीयवादी मानसिकता अद्याप बदललेली नाही. आघाडी केल्यानंतर दलितांची मते आघाडीतील सहकारी पक्षांना मिळतात; परंतु त्यांची मते बसपला मिळत नाहीत. एकंदरित आघाडी केल्यामुळे बसपचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक होते, असे मायावतींनी सांगितले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरड्याप्रमाणे रंग बदलल्याची टीका त्यांनी केली.

मायावतींनी गत महिन्यात आपला भाचा आकाश आनंद यांना उत्तराधिकारी जाहीर केल्यामुळे त्या राजकारण सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु मायावतींनी अद्याप राजकारणातून संन्यास घेणार नसल्याचे स्पष्ट केले. बसप प्रमुखांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप करत लवकरच ईव्हीएमचा वापर बंद होईल, असा विश्वास व्यक्त केला. केंद्र व राज्यातील भाजप सरकार आपल्या निष्क्रियतेवर पडदा टाकण्यासाठी धर्म व संस्कृतीच्या राजकारणाचा आधार घेत असून, मोफत रेशन देऊन लोकांना गुलाम बनवले जात आहे. भाजपच्या या राजकारणामुळे लोकशाही व राज्यघटना कमकुवत होत आहे, असा घणाघात मायावतींनी केला. बसपकडून मायावतींचा जन्मदिन जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा केला जातो

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!