चंद्रपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती आयोगाने दिले आहेत. आयोगा समोर साश्रीसाठी हजर न झाल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. आयोगाने गौडा यांना आपल्या समोर हजार राहण्याचे समन्स जारी केले होते. 16 फेब्रुवारी रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश जारी केले होते. आदेश देऊनही आयोगा समोर हजर न झाल्याने त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत.
चंद्रपूरचे रहिवासी असलेल्या विनोद खोब्रागडे यांनी आयोगा समोर एक याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनी म्हटले होते की, राजुरा तालुक्यातील कुसुंबी गावामध्ये माणिकगड कंपनी आदिवासींच्या जमिनी बळकावत असून तिथे अतिक्रमण करत आहे. या अतिक्रमणासाठी जिल्हा प्रशासनाने मदत केल्याचा आरोप खोब्रागडे यांनी केला होता.
सदर प्रकरणाची सुनावणी करत असताना आयोगाने जिल्हा प्रशासनाचे याबाबत काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी गौडा यांना आयोगा समोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. अनेकदा सांगून, समन्स जारी करूनही ते आयोगा समोर हजर न झाल्याने त्यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले आहेत.