ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संचारबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल;6 मे पासून सुरू होणार परीक्षा: कुलगुरू डॉ.फडणवीस

सोलापूर, दि.16- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित केलेल्या 30 एप्रिल 2021 पर्यंतच्या कडक संचारबंदीमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. 3 मे पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा या 6 मे 2021 पासून सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

गतवर्षी कोरोना आणि टाळेबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरित्या पार पडून त्याचे निकालही जाहीर झाले. आतादेखील राज्यात आणि देशात कोरोनाचे संकट कायम आहे. कोरोना संसर्गाची भीती कायम असून यामुळे यंदादेखील ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहेत. विद्यापीठ परीक्षा विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. आता 6 मे पासून बीए, बीकॉम, बीएस्सी भाग एक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत.

ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी तीन मिनिटांची एक व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आली आहे. ती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षा विभागाकडून पोहोचवली जाणार आहे. याचबरोबर हेल्पलाईन क्रमांक देखील दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, अशा सोप्या पद्धतीने ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी सोय विद्यापीठ परीक्षा विभागाकडून केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाइल, लॅपटॉप, संगणकावरून ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. विकास कदम यांनी दिली. प्र कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्यासह विद्यापीठातील इतर अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी यांचे ऑनलाईन परीक्षेसाठी सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!