दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील प्रमुख मुद्यांवर तासभर चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून लक्ष घालण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यातील महत्त्वाच्या मुद्यांवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पंतप्रधानांसोबत चर्चा झाली असून यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर आम्ही तिन्ही पक्षातील नेते समाधानी आहोत असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने घेतल्या बद्दल मोदी सरकारचे आभार देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी मानले.