चिमणी कोणत्याही परिस्थितीत पाडू देणार नाही : आप्पासाहेब पाटील; चपळगाव विविध कार्यकारी सोसायटीचा ठराव
अक्कलकोट, दि.२९ : सिद्धेश्वर कारखाना म्हणजे शेतकऱ्यांचा कणा आहे आणि तोच जर कोणी उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आम्ही उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. चिमणी कोणत्याही परिस्थितीत पाडू देणार नाही, असा इशारा चपळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब पाटील यांनी दिला आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी विरोधात शासनाने केलेल्या कार्यवाही बाबत चपळगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थेच्या संचालक मंडळाची तातडीची सभा अध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत बोलवण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
चिमणी पाडकामाच्या विरुद्ध ठराव घेऊन प्रसंगी शेतकऱ्यांना एकत्र आणून तीव्र आंदोलन छेडण्याची शेतकऱ्यांमार्फत चालू आहे. सिद्धेश्वर सहकारी कारखान्यामुळे आमच्या गावातील संपूर्ण शेतकरी व शेतमजूर व सभासद यांच्या संसारास कारखान्याचा मोठ्या प्रमाणावर हातभार लागला आहे. हा कारखाना आमच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. म्ह्णून हा निर्णय मागे घ्यावा. शासनाने हरित लवादाची जी नोटीस पाठवली आहे त्यास आमचा जोरदार विरोध आहे. या संदर्भात शासनाने कोणतीही कार्यवाही कारखान्यावर करू नये, नोटीस त्वरित मागे घ्यावी, असा ठराव सर्वानुमते संस्थेच्या सभेमध्ये घेण्यात आला. या ठरावाची प्रत कारखान्याचे अक्कलकोट विभागाचे चपळगाव गटाचे वर्षर रमेश चितळे, श्रीशैल नागणसूरे यांच्याकडे देण्यात आली.
यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष खंडपा वाले, ज्येष्ठ नेते अंबणप्पा भंगे, पंडित पाटील, पंडित भोसले, राजा भंगे, रियाज पटेल, शंकरराव म्हमाणे, मल्लिनाथ पाटील, रमेश भंगे, ब्रह्मानंद माने, शशिकांत पाटील, सोमनाथ बाणेगाव, लक्ष्मण पाटील, मल्लिनाथ सोनार, बापू सोनार, सुभाष बावकर, स्वामीनाथ शिरगुरे, नागनाथ उपासे आदींसह शेतकरी बांधव, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखाना अविभाज्य घटक
कित्येक वर्षापासून सिद्धेश्वर कारखाना हा आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि त्याला जर कोणी धक्का लावत असेल तर त्याला आम्ही धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. हे कारस्थान आम्ही अजिबात खपवून घेणार नाही.
अंबणप्पा भंगे,ज्येष्ठ नेते