पूर प्रवण भागातील नागरिकांनी जनावरे, आवश्यक साहित्यासह त्वरित स्थलांतरीत व्हावे – जलसंपदा मंत्री जयंत पाटील
सांगली, दि. 23 : कृष्णा खोऱ्यातील पूरपरिस्थिती हळुहळु तीव्र व गंभीर होत आहे. त्यासाठीच्या उपाययोजना प्रशासनाकडून कालपासून सुरु करण्यात आली आहे. नवजा जिल्हा सातारा येथे चोवीस तासात 731 मिली मिटर पाऊस झाला आहे. कोयना परिसरात 604 मिमि पाऊस झाला आहे. पहाटे 3 वाजे नंतर थोडीशी उघडिप मिळाली आहे.
चोवीस तासांमध्ये कोयना धरणामध्ये 12 टीएमसी पाणी आले आहे. आज अंदाजे 18 टीएमसी पाणी कोयना धरणामध्ये येईल. त्यामुळे कोयना धरणातील विसर्ग वाढविण्यात येत आहे. तसेच धरणाच्या पुढील गावांमध्ये पावसाचा जोर आहे. निसर्ग आपल्याला थोडीशी सवलत देईल अशी आपेक्षा आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीत जी नेहमी संकटात असलेली गावे आहेत त्या गावांतील नागरिकांनी जनावरे, अत्यंत आवश्यक असलेले साहित्य घेवून लवकरात लवकर स्थालांतरित व्हावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे कृष्ण खोऱ्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत मात्र काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावांनी स्थलांतरित व्हावं. pic.twitter.com/lIaGXmnmiM
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 23, 2021
सध्या आयर्विंन पूल येथे पाणी पातळी 40 फुटांहून अधिक असून कोयना धरणातून विसर्ग वाढल्यामुळे पाणी पातळी संध्याकाळ पर्यंत आणखी 10 ते 12 फुट वाढण्याची शक्यता आहे. सांगली आयर्विंन पुलाखाली पाणी पातळी 52 फुटांपर्यंत जाईल. त्यामुळे सांगली शहरातील आवश्यक त्या सर्वांचे स्थलांतरण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. असे सांगून जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले.
जिल्ह्यातील लोकप्रतिनधी, नगरसेवक, सरपंच तसेच शासकीय यंत्रणा यांनी संभाव्य परिस्थिती लक्षात घेवून ताबडतोब हलचाल करावी. कोयना व वारणा धरणातील सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून सर्व ती माहिती घेण्यात येत आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रशासनाशी सतत संपर्क असून त्यांना विसर्ग वाढविण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की, धरण क्षेत्रात व धरण क्षेत्राबाहेर फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही खुप पाऊस पडला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते त्यामुळे वेळीच नदी काठच्या गावांतील नागरिकांचे प्राधान्याने स्थालांतरण करणे हे अंत्यंत आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. एनडीआरएफची टीम कामाला लागली आहे. परंतु बोटींची वाट न पाहता सध्या सुरु असलेल्या वाटांवरुन नागरिकांनी स्थलांतरण व्हावे. सर्वांची काळजी घेण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येईल. चिंता करु नये व प्रशासनाला सहकार्य करावे.