कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना
बारामती दि. 25 : बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. मात्र कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखा, तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सतर्क राहून योग्य नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर आदी मान्यवरांसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे परंतु प्रशासनाने उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी रेट वाढता कामा नये. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात, सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे, कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या बैठकीपूर्वी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना अतुल बालगुडे, नगरपरिषद सदस्य, बारामती व देसाई इस्टेट मधील नागरिकांच्या तर्फे 300 फूड पॅकेट मदत म्हणून पूरग्रस्तांना पाठविण्यात आले. या मदतीचे वाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आले. यावेळी बारामती पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी संजय जाधव यांच्या ‘आठवणींची वही’ या काव्यसंग्रहाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.