सोलापूर : जिल्ह्यातील कोणत्याही रूग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होऊ देऊ नका. ऑक्सिजनचा तुटवडा भासू देऊ नका. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या रूग्णांनाच देण्याचे नियोजन करा, यासाठी रूग्णालयांच्या ऑक्सिजनवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकसचिव तथा उर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी केल्या.
श्री. वाघमारे यांनी आज जिल्ह्यातील कोरोना स्थिती, ऑक्सिजन, लसीकरण याबाबत ऑनलाईन बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, वैश्यंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर आदी उपस्थित होते.
श्री. वाघमारे यांनी सांगितले की, ऑक्सिजनचा आणि व्हेंटिलेटरचा वापर करताना दवाखान्यात, डीसीएच, डीसीएचसीमध्ये प्रशिक्षीत स्टाफ असायला हवा. त्यांना आणखी प्रशिक्षण द्या, ऑक्सिजनच्या बाबतीत कोठेही अनुचित प्रकार होणार नाही, यासाठी फायर ऑडिट करा. कोरोना रूग्णांच्या दवाखान्यात कोठेही विजेची अडचण येणार नाही, हे पहा. रूग्ण पहिल्या स्टेजमध्येच उपचारासाठी पोहोचला पाहिजे, याचेही नियोजन करा. जिल्ह्यात कोठेही रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही, याचीही दक्षता घ्या. इंजेक्शनची गरज आणि वापर कमी करा, रेमडेसिवीरची बनावट विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रूग्णसंख्या वाढणार नाही, याकडे लक्ष द्या. ग्रामीण भागाचा मृत्यू दर 1.60 तर शहराचा 7.86 टक्के आहे, याकडेही कटाक्षाने लक्ष द्या. यासाठी कृती आराखडा तयार करा. जिल्ह्याला सीएसआर निधीमधून साहित्य, यंत्रसामग्री उपयोगात येणारी आणि हाताळण्यास सुलभ असणारीच खरेदी करावीत. हा निधी उर्जा विभाग उपलब्ध करून देणार आहे, असेही श्री. वाघमारे यांनी सांगितले.
सर्वांनी लसीकरणासाठी प्रयत्नशील राहून जास्तीत जास्त लस जिल्ह्यासाठी मिळण्याबाबत नियोजन करावे. लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही, याचीही दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
श्री. शंभरकर यांनी कोरोनाची स्थिती, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि हॉस्पिटलची स्थितीची माहिती दिली. रूग्णसंख्येबाबत डॉ. जाधव यांनी सादरीकरण केले.
जिल्ह्यातील 115 हॉस्पिटलमध्ये पाच अभियंता महाविद्यालयाच्या तज्ज्ञांना पाठवून त्रुटी दूर करून फायर ऑडिट केले आहे. ऑक्सिजनसाठी नवीन 14 ठिकाणी प्लान्ट बसवत असून सध्या 48 मेट्रीक टन एवढा ऑक्सिजन प्राप्त आहे. सर्व डॉक्टरांना ऑक्सिजन बचतीच्या सूचना दिल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
श्री. स्वामी म्हणाले, तालुका, जिल्हा रूग्णालयांवर भार पडू नये, यासाठी जिल्यान त 100 ठिकाणी पाच हजार लोकसंख्येच्या गावात कोविड केअर सेंटर उभारणार आहे. यापैकी 60 ठिकाणी सीसीसी सुरू झाले असून जिल्हा परिषदेमार्फत औषध पुरवठा करण्यात येत असून खाजगी डॉक्टरांची सेवा घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. शिवशंकर यांनी सांगितले की, शेजारील राज्यातील, जिल्ह्यातून शेवटच्या स्टेजमधील रूग्ण येत असल्याने मृत्यू दर शहराचा वाढत आहे. शहरात 335 डीसीएच/डीसीएचसी दवाखाने असून 448 आयसीयू आणि 191 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मनपाच्या वेबसाईटवर रोज बेड उपलब्धेबाबत माहिती दिली जाते.
रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून जिल्ह्यात तीन केसेस नोंद केल्या आहेत. कडक लॉकडाऊनची कारवाई सुरू असून 250 होम गार्ड, 10 रेल्वे पोलीस अधिकारी यांच्याही सेवा घेण्यात आल्या आहेत. पोलिसांना कोरोना झाला तर तत्काळ उपचारासाठी पंढरपूर पोलीस संकुल येथे केवळ 38 तासांत सर्व सुविधायुक्त 82 बेडच्या कोविड हॉस्पिटलची उभारणी केली आहे. यामध्ये 42 ऑक्सिजनचे बेड व इतर 40 बेड असल्याची माहिती श्रीमती सातपुते यांनी दिली.
डॉ. कडूकर यांनी सांगितले की, शहरात लॉकडाऊनबाबत दंडात्मक कारवाई सुरू आहे. होलसेल आणि रिटेल विक्रेत्यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. पोलिसांसाठी 30 बेड ऑक्सिजन तर 30 खाजगी व्यक्तींसाठी सोय केली आहे.