तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील हिळळी ग्रामस्थांनी लसीचे महत्व ओळखत गावातील अठरा वर्षावरील सर्व व्यक्तींना पहिला डोस शंभर टक्के पूर्ण केला आहे. यामुळे आरोग्य विभागाने देखील कौतुक केले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र नागणसूर येथील कर्मचारी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे यांच्या सहकार्याने एकूण आठ वेळा हे लसीकरण शिबिर राबविण्यात आले. त्यामुळे हे शक्य झाले.हिळळीचे सरपंच आप्पाशा शटगार, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनी यात मोलाची भूमिका घेत गावांमध्ये प्रत्येकाला लसीचे महत्त्व पटवून दिले.त्यामुळे पहिल्या डोसचे महत्त्व नागरिकांना कळाले आणि हा टप्पा यशस्वी झाला आहे. यासाठी उपसरपंच सलीम मुजावर यांनी देखील मोलाची भूमिका घेत ग्रामस्थांना लसीचे महत्त्व पटवून दिले.
आता दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थ तयारीला लागले असून आरोग्य विभागाच्या सतत संपर्कात आहेत. हा डोस देखील लवकरच पूर्ण करून गाव शंभर टक्के लसीकरणयुक्त करण्याचा मानस सरपंच शटगार यांनी व्यक्त केला आहे.