ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना महामारीने विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षातला आनंद हिरावून घेतला !

उन्हाळ्याच्या दीर्घकालीन सुट्टीनंतर दरवर्षी शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने ‘स्कूल चले हम’ म्हणत शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या ‘प्रवेशोत्सवाने’ बहरून जायचा.नवा गणवेश, नवे दप्तर, नवा जोश अशा जय्यत तयारीनिशी मोठ्या सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकात एक उत्साह निर्माण होऊन या नवीन शैक्षणिक वर्षाला आरंभ होत होता.

शाळेमध्ये पहिली घंटा वाजणार म्हणून विद्यार्थी जोरात तयारी करुन शाळेमध्ये ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारा समोर सडा मारुन, रांगोळी टाकून शाळेच्या परिसराची साफसफाई करून चकाचक केले जायचे. हजारो चिमुकल्यांची पावले पहिल्यांदाच शाळेत प्रवेश होणार असल्याने शिक्षक विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी दारावर थांबायचे. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये गुलाब पुष्प देऊन जल्लोशात स्वागत करण्यात येत होते. तर काही ठिकाणी बैलगाडीत विद्यार्थ्यांना सजवून संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढलक जायची. या प्रकारे विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसाची मज्जा घेत जल्लोष करत होते.

पहिल्या दिवशी आपल्या आई-वडिलांसह रडत रडत शाळेच्या बाकावर ही चिमुकली स्थिरावणार चित्र, शाळेचा गणवेश, पाटी-पेन्सील, वॉटरबॅग यांसह एक-दोन पुस्तके घेऊन या बाल-गोापालांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा श्रीगणेशा होताना मनाला प्रसन्न वाटायचे. कुणी हसत हसत, तर कुणी रडत-पडत शाळेची पायरी चढताना दिसून येत होते. पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवणारी चिमुकली मुले नवीन मित्रांच्या संगतीने शाळेतला पहिला दिवसाचे चित्र, सुट्टीवरुन परतणारी मुले नवीन वर्गातील आपला बेंच फिक्स करण्यासाठी धडपडणारी विद्यार्थी, नवीन वर्गातील नवीन वर्गशिक्षक आणि नवीन सजावटीची उत्सुकता या विद्यार्थ्यांना आतुरतेने लागायचे. एकीकडे विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील घालमेल, तर दुसरीकडे शाळांचीही प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी पाहून पालक ही खूश व्हायचे. या सर्व गोष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळत होती.

या नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस उत्सवरूपी साजरा करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने आधीच दिल्या जायच्या. त्यानुसार, शाळेच्या पहिल्या दिवशी फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत पुस्तक वितरण कार्यक्रम होत असे. पहिल्या दिवशीच्या माध्यान्ह भोजनात गोड पदार्थांचा समावेश करुन शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागतामुळे आणि प्रसन्न शैक्षणिक वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शाळेबाबतची गोडी अधिकच वाढत असे. एकूणच शाळेचा पहिल्या दिवसाचा उत्साह पाहून विद्यार्थ्यांना ज्ञान मंदिराची दारे आपोआप खुली व्हायचे. परंतु या कोरोना महामारीने विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षातला आनंद पूर्णपणे हिरावून घेतला गेला आहे.

यंदाचे दुसरे शैक्षणिक वर्ष सुुुुरु होत आहे, परंतु अजून ही ज्ञान मंदिराची दारे या चिमुकल्यासाठी बंदच आहेत. या मुळे यंदा ही विद्यार्थी नवीन प्रवेशोत्सवा पासून वंचितच राहणार की काय ? असा प्रश्न सध्या विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांना पडला आहे. कारण शाळा सुरू होण्या संदर्भात अजून तरी कुठलेच ठोस निर्णय होताना दिसून येत नाही. कोरोना महामारीने विद्यार्थ्यांचा हिरावून घेतलेला आनंद परत कधी मिळेल ? याची आतुरतेने वाट सध्या पालक व शिक्षक पाहताना दिसतात. यासाठी विद्यार्थी ही गावपातळीवरील गुरुजींकडे विचारणा करतात,गुरुजी,यंदा तरी शाळा सुरु होणार का ? या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला गेल्या वर्षभरापासून गुरुजींकडे उत्तर मिळताना मात्र दिसून येत नाही.

रेखा सोनकवडे, मुख्याध्यापिका वागदरी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!