सांगली : ऊसाचा एफआरपी, वीज बिल माफी आणि अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या गाडीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारसह विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. “कोरोना गेला खड्ड्यात, आधी आमच्या एफआरपीचे पैसे द्या”, असा गर्भित इशारा स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला आहे. यावेळी बोलताना भ्रष्टाचार आणि दालन सजवायला पैसा आहे, मग वीज बील माफ करायला का नाही? असा संतप्त सवाल करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला.
तर वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून बोलताना शेट्टी म्हणाले, विधानसभेत वीज बिलाबाबत विरोधी पक्षाने आवाज उठवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज वसुली आणि तोडणीला स्थगिती दिली. पुढील चर्चेनंतर बिल वसूल करू असं सांगितले. मात्र पुढची चर्चा ही झाली नाही, पुढचा निर्णयही झाला नाही. मग चर्चा न होता ती स्थगिती का उठवली, काय चाललंय या राज्यामध्ये? असा संतप्त सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. विजेची बिलं भरायला लोकांच्याकडे पैसे नाहीत. वर्षभर वितरण कंपनी झोपा काढत राहिली, लोकांना वर्षभर वीज बिलं दिली नाहीत. मधे ऊर्जामंत्री यांनी लोकांच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे वीज बिल वसुली करणार नाही, असं सांगितलं. मात्र आता अचानक वर्षभराच्या वीज बिलांची मार्च महिन्यामध्ये वसुली चालू केली आहे.