सोलापूर, दि. 15 : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल 2021 रोजी मतदान आहे. मतदान करण्यासाठी मतदारांना जाणे येणे सुलभ व्हावे यासाठी 16 एप्रिलच्या सकाळी सात वाजल्यापासून ते 18 एप्रिल 2021 सकाळी आठ वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी शिथील करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली, श्री. शंभरकर यांनी याबाबत आज आदेश जारी केला.
त्या आदेशात नमूद केले आहे की, पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी येत्या शनिवारी म्हणजेच 17 एप्रिल 2021 रोजी मतदान आहे. मात्र करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र मतदारांना येणे जाणे सोयिस्कर व्हावे, निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रकियेत सहभागी होता यावे, यासाठी संचारबंदी मध्ये शिथीलता देण्यात येत आहे. मात्र या काळात जमाबंदीचे आदेश कायम राहतील.
त्याचबरोबर जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर मतदारसंघातील नसलेल्या राजकीय व्यक्तिंना मतदार संघाबाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे, असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था, संघटना यांच्या वर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 मधील तरतुदी नुसार कारवाई केली जाईल. ही कारवाई संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांनी करावी, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेशात नमूद केले आहे.