ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात सहा गावात कोविड केअर सेंटर सुरू करणार,पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

 

अक्कलकोट,दि. २५: अक्कलकोट तालुक्यात सहा गावात कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार आहे.यावरील
उपचार करण्यासाठी व पायाभूत सुविधा उभारण्यांसाठी आमदार निधीचा वापर करावा, अशा सूचना पालकमंत्री
दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.रविवारी,अक्कलकोट तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे यांनी बैठक घेतली.त्यावेळी ते बोलत होते.ही बैठक अक्कलकोट तालुका पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली.या बैठकीला खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, सभापती सुनंदा गायकवाड, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, तहसीलदार अंजली मरोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे,ग्रामीणचे वैयक्तिक अधीक्षक डॉ.अशोक राठोड आदी उपस्थित होते.प्रारंभी या बैठकीत प्रांताधिकारी सुप्रिया डांगे यांनी अक्कलकोट मधील परिस्थितीची माहिती दिली. तालुक्यातील १३१ पैकी २१ गावांत सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचे सांगितले.अक्कलकोटमधील नागरिक उपचारासाठी सोलापूर शहरात जातात. मात्र तरीही अक्कलकोटमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची तयारी करण्यासाठी आमदार निधीचा वापर करावा, असेही भरणे यांनी सांगितले.सध्याच्या सीसीसी कोविड सेंटरमधील बेडची संख्या कमी आहे अन्य इमारत ताब्यात घेऊन ती वाढवली जाईल. संभाव्य रुग्णांची संख्या वाढणार हे गृहीत धरुन कोविड केअर सेंटर सुरु करण्याची तयारी ठेवा.तालुक्यातील लसीकरणाचा वेग कायम ठेवावा.१ मे २०२१ पासून १८ वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार आहे. यासाठी नियोजन केले जावे, असेही भरणे यांनी सांगितले.बैठकीआधी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड डेडिकेटेड हेल्थ सेंटर चे उद्घाटन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय देशमुख,देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी आदी उपस्थित होते.

सीसीसी सेंटरचे बेड
वाढवण्याचा प्रस्ताव

अक्कलकोटमध्ये आजपासून पंचवीस बेडचे डेडिकेटेड हेल्थ सेंटर सुरू झाले आहे.आता ऑक्सिजन देखील उपलब्ध झाले आहे. त्याठिकाणी रुग्णांनी उपचार घ्यावा. सीसीसी कोव्हिडं सेंटर देखील आणखी वाढवण्याचा प्रस्ताव आहे.त्यासाठी देखील आम्ही लवकरच प्रयत्न करू.

दत्तात्रय भरणे,पालकमंत्री

आवश्यक त्या सुविधा
लवकर पुरवठा करा

तालुक्यात आता कोव्हिडं सेंटर सुरू झाले आहे परंतु त्याठिकाणी ऑक्सिजन कमी पडता कामा नये तसेच या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टरांचे आदेश तातडीने द्यावे तसेच रेमडेसिविर इंजेक्शन सुद्धा तालुक्याला उपलब्ध करून द्यावेत,अशी मागणी पालकमंत्र्यांकडे
केली आहे.

सचिन कल्ल्याणशेट्टी,आमदार

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!