मुंबई : यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. संपूर्ण खरीप पिकांची मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या राज्यात सुरू असणाऱ्या पावसाने रब्बीचा हंगाम सुद्धा धोक्यात आला असल्याने राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी करत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर प्रश्नांकडे सुद्धा अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विधानसभेचे विरोध पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्न संबंधी त्यांच्याशी चर्चा केली.
राज्याचे मुख्यमंत्री मा. @mieknathshinde जी यांची वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात व शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याबाबत आग्रही मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली.याबरोबरच राज्यातील विविध प्रश्नांसंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. pic.twitter.com/mDEgBNTxe1
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 19, 2022
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जून महिन्यापासून आज अखेर राज्यात सातत्याने पाऊस पडत आहे. या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान खरिपाच्या संपूर्ण पीक गेले असून रब्बी हंगामातील पेरणी केलेले पिकांचे ही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाने जमिनी वाहून गेल्या असून घरांची ही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. तरी राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच राज्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही तरी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन तातडीने मदत देण्यात यावी.