२०० वर्षांपासून अविरत ऑक्सिजन पुरविणाऱ्या पिंपळाच्या झाडाची “हेरिटेज ट्री”च्या यादीत समावेश करण्याची मागणी
दुधनी : कोरोना काळात सर्वात चर्चेचा विषय बनला होता तो, ऑक्सिजनचा…! ऑक्सिजन अभावी शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या नंतर हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट राज्यातील सर्वच जिल्ह्यामधील रुग्णालयांमध्ये उभारण्यास सुरुवात झाली. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी वृक्षारोपण करण्यावर अधिक भर देण्यात आले. अधिक प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या झाडांमध्ये वड, पिंपळ, कडूलिंब, तुळशी झाडांचा समावेश आहे.
संस्कृतमध्ये पिंपळाच्या झाडाला अश्वथा म्हटले जाते. प्राचीन काळापासून या झाडाची पूजा केली जाते. गौतम बुद्धांना याच झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले असल्यामुळे याला बोधी वृक्ष असेही म्हणतात. श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखालीच देह ठेवला, त्यानंतर कलियुगाला सुरुवात झाली. या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास आहे. महिला पुत्र प्राप्तीसाठी या झाडाची पूजा करतात. 24 तास ऑक्सिजन वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही पिंपळाचे झाड खूप उपयोगी मानले जाते. सर्वसाधारणपणे झाडे दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बनडायऑक्साइड सोडतात. वैज्ञानिकांच्या शोधानुसार हे एकमेव असे झाड आहे, जे दिवसरात्र 24 तास ऑक्सिजन देते. या झाडाच्या जवळपास राहणाऱ्या व्यक्तीची प्राणशक्ती वाढते. या झाडाची सावली उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम राहते. या व्यतिरिक्त या झाडची पाने, फुले, फळ औषधी गुणांनी भरलेले आहेत. पिंपळाच्या झाडाचा विस्तार आणि उंची सर्वाधिक असते. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडासोबत धार्मिक भावनाही जोडलेल्या असतात.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या नागरी भागात ५० किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना “हेरिटेज ट्री” असे संबोधून यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात येणार असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील दैनिक संचारचे पत्रकार गुरुशांत माशाळ यांनी त्यांच्या घरच्या अंगणातील २०० वर्षांपेक्षा अधिक जुना महाकाय पिंपळाच्या झाडाची ‘हेरिटेज ट्री’ च्या यादीत समावेश करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
माणसाच्या जगण्यासाठी संजीवनी ठरलेल्या या पिंपळाच झाड तब्बल दोन शतकांपासून अविरत लाखो लिटर ऑक्सिजन पुरवठा करत दिमाखात उभा आहे. या झाडाच्या आवती-भोवती सात-आठ घरे आहेत. सदर झाड दहा ते पंधरा फूट जागेवर विस्तारला आहे. उन्हाळ्यात या परिसरातील रहिवासी झाडाखाली बसून मुक्त स्वरूपात ऑक्सिजन सेवन करत गप्पा गोष्टी करत बसतात. त्यामुळे कोरोना काळात या परिसरात कोणालाही ऑक्सिजनची कमतरता भासली नाही.
तरी अशा या जुन्या वृक्षाचा संवर्धन आणि जतन करण्याची मागणी पत्रकार गुरुशांत माशाळ यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.