बनावट नोंद प्रकरणी तलाठी, मंडल अधिकारी यांना खातेनिहाय चौकशीची प्रातांची नोटीस, सुलेरजवळगे येथील प्रकार
अक्कलकोट : पतीच्या निधनानंतर वारस म्हणून कायदेशीर पत्नी आणि मुलांची नावे न लावता बनावट प्रतिज्ञापत्र आणि खोटी कागदपत्रे वापरून संगनमताने अनधिकृत महिलेचे नांव सात बारा उतारावर लावल्याप्रकरणी तलाठी आणि मंडल अधिकारी यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशी का करू नये,याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे.त्यामुळे
खळबळ उडाली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथील शेतकरी बसवराज तोरणगी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा रोहित तोरणगी यांनी विहीत नमुन्यातील अर्ज देऊन वडिलांच्या पश्चात शेतजमीनीचे वारसदार म्हणून नाव लावण्याची विनंती तलाठीकडे केली होती. दरम्यान एका अनधिकृत महिलेने बोगस शिक्का मारलेले बनावट प्रतिज्ञापत्र आणि अवैध पुरावे देऊन मयताची पत्नी असल्याचा बनाव करून तलाठी यांच्याकडे आपल्या नावाच्या नोंदीसाठी अर्ज दिला होता.ती बेकायदेशीर कागदपत्रे ग्राह्य धरून तलाठी यांनी अनधिकृत महिलेची नोंद घेतली.त्याला राहूल तोरणगी यांनी लेखी हरकत नोंदवली होती.मात्र करजगीचे मंडल अधिकारी
यांनी त्या हरकतीची दखल न घेता बनावट कागदपत्राद्वारे तलाठी यांनी घेतलेली बेकायदेशीर नोंद प्रमाणित केली.
त्यानंतर कायदेशीर वारसदार रोहित तोरणगी यांनी त्यांचे कायदेशीर प्रतिनिधी बसवराज बगले यांच्या मार्फत अपिल केले.उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोलापूर यांनी सुनावणी घेऊन संबंधित कागदपत्रे तपासली आणी युक्तीवाद ऐकून तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्या बेकायदेशीर नोंदीला स्थगिती दिली.
याशिवाय बसवराज बगले यांनी या प्रकरणी तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी अनधिकृत महिलेशी संगनमत करून,खोटी आणि बनावट कागदपत्रे तयार करून शेतजमीन हडपण्यासाठी फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.आणि खातेनिहाय चौकशी करून सेवेतून बडतर्फ करावे.अशी मागणी केली आहे. त्यानुसार प्रांताधिकारी दिपक शिंदे यांनी सुलेरजवळगेचे तलाठी राहूल वाघमारे आणि करजगीचे मंडल अधिकारी मनोज गायकवाड यांना या गंभीर अपराधाबद्दल निलंबन आणि खातेनिहाय चौकशीची कारवाई का करू नये ? याचा खुलासा ४८ तासाच्या आत करावा,अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.