सोलापूर (प्रतिनिधी) :श्रावण बाळाने केवळ आपल्या आई वडिलांची सेवा केली. मात्र लोकमंगलच्या माध्यमातून आमदार सुभाष देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय हजारो लोकांची दररोज सेवा करतात. गोरगरिबांची सेवा कशी करावी हे लोकमंगल आणि देशमुख कुटुंबाकडून शिकावे, असे प्रतिपादन भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले.
लोकमंगल फाउंडेशन आणि रिलायन्स फाउंडेशनच्यावतीने विकास नगर येथील संपर्क कार्यालयात आयोजित अन्नधान्य कीट वाटपाच्या प्रसंगी सोमय्या बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, युवा नेते मनीष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. सोमय्या पुढे म्हणाले की, लोकमंगलतर्फे अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून दररोज हजारो गोरगरीब कुटुंबांना जेवणाचे डबे देण्यात येतात. याशिवाय विविध हॉस्पिटल मधील रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांनाही डबे देण्याचे काम सुरू आहे. तसेच मनीष देशमुख यांनी सुरू केलेली कोवीड हेल्पलाइन रुग्णांसाठी एक जीवनदान ठरली आहे.
या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत शेकडो रुग्णांना औषधे, इंजेक्शन आणि इतर मदत केली आहे. देशमुख परिवाराचा जन्मच लोकांच्या सेवेसाठी झाला आहे. गोरगरिबांची सेवा कशी करावी हे लोकमंगलकडून सर्वांनी शिकण्यासारखे आहे, असे सोमय्या म्हणाले.
यावेळी मनीष देशमुख यांनी माजी खासदार सोमय्या यांचा सत्कार करून कोरोना काळात लोकमंगलने केलेल्या विविध कामांची माहिती दिली. त्यानंतर सोमय्या यांच्या हस्ते गोरगरीब महिलांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी महेश देवकर, डॉ. शिवराज सरतापे आदींची उपस्थिती होती.