ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पूरग्रस्तांसोबत भोजन घेत देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या व्यथा

मुंबई, २८ जुलै : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा जिल्ह्याचा दौरा केला. पूरग्रस्तांसोबत भोजन घेत त्यांनी सर्वांच्या व्यथा जाणून घेतल्या. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्याचा प्रारंभ त्यांनी आज सातारा जिल्ह्यातून केला. मोरगिरी/आंबेघर, शिद्रुकवाडी, कोयनानगर तसेच हुंबरळी इत्यादी ठिकाणी त्यांनी भेटी देत स्थितीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अतुल भोसले, जयकुमार गोरे, नरेंद्र पाटील हे यावेळी उपस्थित होते.

कराड येथून रवाना होण्यापूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र भाजयुमोच्या वतीने मदतसामुग्री असलेल्या वाहनांना आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा झेंडा दाखवून रवाना केले. या मदतसामुग्रीत तयार अन्न, धान्यसामुग्री, पाणी, कपडे इत्यादींचा समावेश आहे. मोरगिरी/आंबेघर येथे पाऊस आणि पूर यामुळे संसार उघड्यावर पडलेले आहेत. तात्पुरत्या निवासी शिबिरांमध्ये त्यांना सद्या ठेवण्यात आले आहे. मोरणा विद्यालय मोरगिरी येथे या पूरग्रस्तांना भेटून, त्यांच्यासोबत भोजन करत त्यांच्या व्यथा देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या. आंबेघर येथे दरड कोसळण्याच्या घटनेत सुमारे १५ लोकांचे प्राण गेले. त्यांच्या कुटुंबियांचे फडणवीस यांनी सांत्वन केले आणि त्यांना मदतसामुग्रीचे वाटप सुद्धा केले.

याठिकाणी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज याठिकाणी हे लोक शिबिरात राहत असले तरी त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनावर लक्ष केंद्रीत करून ते तातडीने करावे लागेल. सुरक्षित जागा शोधून त्यांना नवीन घरे बांधून द्यावी लागतील. पुनर्वसन करताना त्यांच्याशी सल्लामसलत करावी, अशी सूचनाही त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना केली. या नागरिकांना इतर मदत, विविध स्त्रोतांमधून पोहोचते आहे. पण पुनर्वसन हेच प्राधान्य असले पाहिजे. यासाठी घरे आणि रोजगार असा साकल्याने विचार करावा लागेल. भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये, याची सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

यानंतर शिद्रुकवाडी येथे सुद्धा त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. घर, शेतीचे नुकसान, जनावरे वाहून गेली. त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य तातडीने देण्याची गरज आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. येथे सुद्धा त्यांनी मदतसामुग्री वितरित केली. त्यानंतर कोयनानगर येथे स्थलांतरित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या व्यथा देवेंद्र फडणवीस यांनी ऐकून घेतल्या. कायमस्वरुपी पुनर्वसन हीच मागणी येथे आश्रयाला असलेल्या शिबिरातील नागरिकांनी केली. सुमारे १५० कुटुंबांचा हा प्रश्न आहे. त्यांना सातत्याने अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. हे नागरिक म्हणतात की, कोणतेही संकट आले की महिनाभर मदत होते. पण पुन्हा समस्या आहे तशाच राहतात. सरदार सरोवर प्रकल्पाच्या धर्तीवर पुनर्वसन व्हावे, ही त्यांची मागणी आहे. आतातर दरडी कोसळण्यामुळे पुन्हा गावात जाण्याचा मार्गच शिल्लक उरलेला नाही, असे गावकरी सांगतात. त्यामुळे तात्पुरते निवारे उभारणे, त्यासाठी कोयनेचे क्वार्टर्स वापरण्यात यावेत, अशा त्यांच्या मागण्या आहेत. हा प्रश्न सुटेपर्यंत आम्ही पाठपुरावा करीत राहू, असे त्यांनी आश्र्वस्त केले.
पाटण तालुक्यातील हुंबरळी येथे सुद्धा अतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी केली. दरड कोसळण्याने येथे काही घरे उध्वस्त झाली आहेत. लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत दिली पाहिजे. लोकांमध्ये दुःख आहे, निराशा आहे आणि त्यांना अपेक्षा सुद्धा आहेत. आता जागा निश्चित करून युद्धस्तरावर पुनर्वसनाचा विचार केला पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!