अक्कलकोट, दि.८ : अक्कलकोट येथील लायन्स क्लब शाळेत प्रौढ साक्षरता दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डिजिटल साक्षरते विषयी मार्गदर्शन करण्यात आले. संगणक युगात डिजिटल साक्षरता काळाची गरज आहे, असे प्रतिपादन फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष शिरीष पंडित होते.
प्रारंभी श्री स्वामी समर्थ प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. अक्षर कळे संकट टळे, या पारंपरिक विचारापलिकडे जाऊन संगणक प्रणालीच्या डिजिटल ज्ञानाचा वापर काळाची गरज आहे. ऑनलाईन हा नव्या युगाचा पासवर्ड बनला आहे. बॅंक, व्यापार, शिक्षण, विज्ञान समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रात डिजिटल साक्षरता महत्वाची झाली आहे. म्हणून काळाची पावले ओळखून डिजिटल ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र हत्ते, उपाध्यक्ष सुभाष गडसिंग, ॲक्टिव्हिटी चेअरमन सुधीर माळशेट्टी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर मजगे, विरशैव समाजचे अध्यक्ष शिवपुत्र हळगोदे, मल्लिनाथ मसुती, आळगी, राजेंद्र कारीमुंगी , अशोक टोणे व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी अध्यक्ष शिरीष पंडित यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर सचिव विठ्ठल तेली यांनी आभार मानले. सुत्रसंचालन सुभाष गडसिंग यांनी केले.