मुंबई : शिवसेनेतील गळती काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यानंतर मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरातील एका कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, सचिव व खासदार विनायक राऊत यांनी पत्रक काढून गजानन किर्तीकर यांच्यावर कारवाई केली. राऊत यांनी पत्रक काढून किर्तीकरांची थेट शिवसेना नेते पदावरुन हकालपट्टी केली आहे.
खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने किर्तीकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते पदावरून हक्कालपट्टी करण्यात आली आहे. गजानन किर्तीकर यांच्या या पक्ष प्रवेशाने शिंदे गटाच्या खासदारांची संख्या १३वर गेली आहे. या प्रवेशामुळे शिंदे गटाला आगामी मुंबई पालिका निवडणुकीत मदत होणार आहे.