मुंबई दि. १७ डिसेंबर – मोदींना लोकं निवडून देतात हा दावा म्हणजे या देशातील लोकशाही संपवायची आहे का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या देशात हिटलरसारखी परिस्थिती निर्माण करुन सगळे नियम, घटना बदलून स्वतःकडे सर्व अधिकार घ्यायचे आहे का अशी शंका निर्माण होऊ लागली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
पाच राज्यात निवडणूका होणार असून या निवडणूकांच्या माध्यमातून भाजपची किती शक्ती राहिली आहे. किती लोकं पसंती देतात हे स्पष्ट होईल असे सांगतानाच ५० वर्ष आम्हीच राहू याचा अर्थ लोकशाही संपवायची आहे परंतु जनता त्यांना लोकशाही संपवू देणार नाही असे नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले आहे. हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य बोलून भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व कमी करण्याचा खेळ खेळत आहेत…
हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य या शब्दाचा अर्थ भाजपला कळत नाहीय असं बोलून भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व कमी करण्याचा खेळ खेळत आहेत असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी या शब्दाचा अर्थ भाजपच्या लोकांनी शब्दकोशात तपासून पहावा असेही नवाब मलिक म्हणाले.
हिंदूवी या शब्दाचा खेळ भाजपने खेळू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मदारी मेहत्तर तोफखान्याचे सरदार होते. व इतर प्रमुख दलाचे लोक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माच्या आधारावर कधीही राजकारण केलेलं नाही. मात्र भाजपचे लोक चुकीचा इतिहास काही लोकांना पुढे करुन या देशाचा इतिहास बदलून छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबतीत गैरसमज निर्माण करत आहेत असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
केंद्रसरकारने एकतर्फी कुठलाही निर्णय जैतापूरवासियांवर लादू नये…
बळजबरीने कोणताही प्रकल्प होऊ शकत नाही. स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही विकास होत नाही आणि अशक्यही आहे त्यामुळे केंद्रसरकारने एकतर्फी कुठलाही निर्णय लादू नये असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राबवणार असल्याची माहिती संसदेत देण्यात आली त्यावर नवाब मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पूर्वीच्या सरकारने प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लोकांचा विरोध असल्याने तो प्रकल्प पुढे गेला नाही. जोपर्यंत लोकांचा विश्वास संपादीत होत नाही, लोकांची शंका दूर होत नाही तोपर्यंत कुठलाही प्रकल्प करणे योग्य नाही असे केंद्रसरकारला कळवले जाईल असेही नवाब मलिक म्हणाले.