मुंबई : डीआरआयने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून ३५ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. जप्त केलेले ते हेरॉईन ट्रॉली बॅगेच्या खाली लपवले होते. ड्रग तस्करी प्रकरणी डीआरआयने एकाला ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही दिवसापासून परदेशी नागरिक हे छुप्या पद्धतीने ड्रग्ज घेऊन मुंबईत येत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशा तस्करावर डीआरआय, सीमा शुल्क विभाग लक्ष ठेवून असते. नैरोबी येथून एक तस्कर हा ड्रग्ज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्याची माहिती डीआरआयच्या पथकाला मिळाली. त्यामाहिती नंतर आज डीआरआयच्या पथकाने विमानतळावर सापळा रचला.
सकाळच्या सुमारास एक प्रवासी हा विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने डीआरआयने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली. तेव्हा ट्रॉली बॅगेच्या खाली एक पिशवी दिसली. त्या पिशवीत ४.९८ किलो हेरॉईन ठेवलेले होते. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे ३५ कोटी रुपये इतकी आहे. ड्रग तस्करी प्रकरणी डीआरआयने एकाला ताब्यात घेतले आहे. तो ते ड्रग नेमके कोणाला देणार होता याचा तपास डीआरआय करत आहे.