ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनी भिवंडी एस.टी. बससेवा सुरू; माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठपुराव्याला यश

दुधनी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने एस.टी.बंद केले होते. सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव थोडाफार कमी झाल्याने परिस्थिती हळू-हळू पूर्व पदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर दुधनी-भिवंडी या नव्या बस सेवेचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी सात वाजता अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या हस्ते, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या प्रमुख्य उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी रामचंद्रप्पा बिराजदार हे होते. दुधनी- मुंबई बस सेवा सुरू होण्यासाठी माजी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला आज यश आले आहे. त्याचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला.
दुधनी शहर आडत, कापड, व किराणा व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. येथील आडत व्यापारी चेन्नई, मुंबई, पुणे, मध्य प्रदेश, नागपूर, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतर मोठ्या शहरात व्यापार वहिवाट करण्यासाठी ये-जा करत असतात. यापूर्वी पुणे-गाणगापूर, कोल्हापूर-गाणगापूर, सातारा-गाणगापूर आणि इतर लांब पल्याच्या गाड्या दुधनी मार्गे धावत होते. मात्र कर्नाटक सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील वाहनांना बंदी घातली होती. यामुळे सर्व गाड्या रद्द करण्यात आले होते.
यामुळे येथील व्यापाऱ्यांना देशातील विविध भागात जाण्या-येण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. दुधनी-भिवंडी एसटी सेवा सुरू झाल्याने मुंबई-पुणे येथे येण्या – जाण्यासाठी मोठी मदत होणार आहे. यामुळे नागरिकांमधून आनंदाचे वातावरण आहे. 
दुधनी भिवंडी एस.टी बस दुधनी बस स्थानकातून सायंकाळी ७.१५ वाजता प्रस्थान करून पुढे मैंदर्गी, अक्कलकोट, सोलापूर, इंदापूर, स्वारगेट, वल्लभ नगर, पनवेल, बेलापूर, नेरुळ, घनसोली, रबाळे, ऐरोली, कळवा, ठाणे मार्गे भिवंडी पोहचणार आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना कोरोनाचे नियम आणि अटींचं पालन करणं बंधनकारक करण्यात आले आहे.
यावेळी अक्कलकोट बस स्थानकाचे आगार प्रमुख रमेश म्हंथा, वाहतूक नियंत्रक संभाजी पवार, आडत भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, शिवानंद माड्याळ, शिवशरप्पा हबशी, शंकर भांजी, लक्ष्मीपुत्र हबशी, उदयकुमार म्हेत्रे, स्थानक प्रमुख जयसिंह चव्हाण, दुधनी बसस्थानक वाहतूक नियंत्रक प्रियांका कोलाटी, माजी वाहतूक नियंत्रक इरय्या स्वामी, चालक बसवराज पाटील, वाहक रमेश पाटील, आणि इतर नागरिक उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्र संचालन इरण्णा करवीर यांनी केले, आभार गुरूशांत हबशी यांनी मानले.
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!