ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चातुवर्ण्य व्यवस्थेमुळं आपल्याकडून आपल्याच माणसांना मान खाली घालायला लावणारी कृत्ये घडली – सरसंघचालक मोहन भागवत

नागपुर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानावरून नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शुक्रवारी नागपुरात एका पुस्तकाचे प्रकाशन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी जात आणि वर्णव्यवस्था संपवण्याचे आवाहन केले आहे. भूतकाळातील कृत्यांबद्दल ब्राह्मणांनी पापक्षालन करायलाच हवं, असं मत मोहन भागवत यांनी मांडलं आहे.

विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीनं ‘वज्रसूची-टंक’ या डॉ. मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी वा. वि. मिराशी सभागृहात पार पडला. या पुस्तकाच्या अनुषंगानं बोलताना मोहन भागवत यांनी काही सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं. भागवत म्हणाले की, भेदभाव निर्माण करणारी कोणतीही गोष्ट पूर्णपणे नाकारली पाहिजे. भारत असो किंवा इतर कोणताही देश, मागच्या पिढ्यांनी नक्कीच चुका केल्या आहेत. त्या चुका मान्य करायला हरकत नसावी. आपल्या पूर्वजांनी चुका केल्या आहेत, हे सत्य मान्य केले तर त्यांचे महत्त्व कमी होईल, असे वाटत असेल, तर तसे नाही, कारण प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या आहेत.

जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली, याकडं भागवत यांनी लक्ष वेधलं. ‘चातुवर्ण्य व्यवस्थेमुळं आपल्याकडून आपल्याच माणसांना मान खाली घालायला लावणारी कृत्ये घडली. आता या सगळ्याचं पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!