ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन माढा तालुक्यात जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून ई- पीक पाहणी

सोलापूर, दि.७: माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक पाहणीस जिल्हाधिकरी मिलिंद शंभरकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ई – पीक पाहणी ॲप चालू आहे का ? तुम्ही ॲपवर माहिती भरली का? अशी विचारणाही प्रत्यक्ष जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी माढा तालुक्यात प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी ॲपविषयीची माहिती शेतकऱ्यांना समजावून दिली.

श्री. शंभरकर यांनी माढा तालुक्यातील वरवडे आणि मोडनिंब या गावातील शेतीच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी केली. ई-पीक पाहणी ॲप वापरताना काही अडचणी आल्या का? पिकांची नोंद ॲपमध्ये केली का ? अशी विचारणाही त्यांनी केली . ई-पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. जे पीक आहे त्याची अचूक नोंद करता येते. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी देण्यास शेतकऱ्यांना मदत होत आहे. आपल्या पिकांची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही, असे जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले.

शेतकऱ्यांनी ॲपमध्ये भरलेली ई-पीक पाहणीची माहिती तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी यांची नोंद त्वरित घेण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या. ई-पीक पाहणी ॲप जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

ई-पीक पाहणी ॲपमुळे आम्हाला शेतात जाऊन पिकांची अचूक नोंद करता येऊ लागली आहे. तलाठी कार्यालयात जावे लागत नसल्याने वेळेची बचत होत आहे. हा शासनाचा उपक्रम चांगला असल्याची प्रतिक्रिया वरवडेचे शेतकरी नवनाथ घाडगे आणि मोडनिंबचे विजयकुमार नामदे यांनी व्यक्त केली.

ई-पीक पाहणी दौऱ्यावेळी प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण, मंडल अधिकारी श्री.गायकवाड यांच्यासह तलाठी, शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!