कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीने आज सकाळी टाकले आहेत. कागल आणि पुण्यातील घरांवर ही करावाई करण्यात आली. दरम्यान काही दिवसांआधी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. सकाळी साडेसहा वाजेपासून ईडी आणि आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापा मारला असून त्यांच्या संपत्तीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडी आणि आयकर विभागाचे तब्बल २० अधिकारी सकाळी साडेसहाच्या सुमारास राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी आले. त्यानंतर पोलिसांकडून मुश्रीफांच्या घराची सुरक्षा वाढवून अधिकाऱ्यांनी मुश्रीफांच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे. कोणत्याही बाहेरील व्यक्तीस आत येण्यास आणि बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.
बोलताना हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली कि, माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने दुरध्वनीवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम सुरू आहे. माझ्यावरील ईडीच्या या कारवाई विरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे