ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महायुतीची बैठक रद्द होताच एकनाथ शिंदे निघाले गावी

मुंबई, वृत्तसंस्था 

 

विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला. आता सत्ता स्थापनेसाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी गुरुवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा केली. या बैठकीत सत्ता स्थापनेबद्दल चर्चा झाली. यानंतर पुढील चर्चा मुंबईत केल्या जाणार असताना एकनाथ शिंदे त्यांच्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे आजच्या प्रस्तावित बैठका रद्द झाल्यात. भाजपाच्या गटनेते पदाची निवड देखील पुढे ढकलण्यात आली असून उद्या अमावस्या असल्याने ही बैठक आता 1 डिसेंबर रोजीच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावाला रवाना झाले आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांनी ठाण्यातून साताऱ्यासाठी प्रयाण केले. त्यांचा मुक्काम गावातच असेल. सत्ता स्थापनेसाठी मुंबईत बैठका आयोजित करण्यात आल्या असताना एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेला आणखी विलंब होणार आहे. शिंदे साताऱ्याला अचानक का गेले, यामागचे कारण अद्याप समूज शकलेले नाही.

विधानसभा निवडणुकीचा निकाल गेल्या शनिवारी लागला. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी चर्चा, बैठका सुरु झाल्या. एकनाथ शिंदेंनी दोन दिवस मौन बाळगले. या कालावधीत शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी मुख्यमंत्रिपद पुन्हा शिंदे यांनाच मिळावे यासाठी जोरदार बॅटिंग केली. शिवसेना नेते मुख्यमंत्रिपदासाठी प्रचंड आग्रही होते. या दोन दिवसांत शिंदेंनी माध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही. या कालावधीत शांत राहून शिंदेंनी त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवल्याचे बोलले जाते.

दोन दिवस मौन बाळगल्यानंतर शिंदेंनी पत्रकार परिषद घेत निर्णयाचे सर्वाधिकार भाजप नेतृत्त्वाला दिले. माझ्याकडून कोणतीही आडकाठी होणार नाही. भाजपचा निर्णय माझ्यासाठी आणि शिवसेनेसाठी अंतिम असेल, असे म्हणत शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा जवळपास सोडून दिला. त्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह दिल्लीला रवाना झाले. त्यांची शहांशी जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर शहांनी शिंदे, फडणवीस, पवार यांच्याशी एकत्रित बोलले. शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात गृह विभागासह अनेक महत्त्वाची खाती मागितल्याची चर्चा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!