मुंबई, दि. ३ डिसेंबर २०२१ : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड डिसेंबर महिन्यात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातच होईल व अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
टिळक भवन येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाचा कालावधी कमी होता. अधयक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी तीन दिवसांची कालावधी लागतो त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवड आतापर्यंत झाली नाही. हिवाळी अधिवेशनात मात्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल. आवाजी मतदानाने निवड होण्याची पद्धत देशभर सर्वच राज्यात आहे त्यात काही गैर नाही. विधानसभेने त्यांच्या नियमावलीत बदल केलेला आहे. महाराष्ट्रातही विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवड याच पद्धतीने होत असते त्यामुळे यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही.
अमरावती दंगलीप्रकरणी फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, अमरावती दंगलीत भाजपाचे आमदार व नेतेच सक्रीय होते, भाजपाच्या नेत्यांनीच चिथावणी देणारी विधाने केली. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर अमरावती दंगलीचे खापर फोडणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे व असा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने होत आहे. राहुल गांधी यांच्याविषयी बोलण्याचा फडणवीस यांना नैतिक अधिकार नाही. गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग केला आहे, बलिदान दिले आहे, भाजपाने देशासाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून देश विकणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असेही पटोले म्हणाले.