(मारुती बावडे)
अक्कलकोट : ओबीसी आरक्षण व अन्य कारणामुळे राज्यात नगरपालिका निवडणुका जरी पुढे जात असल्या तरी अक्कलकोटकरांना पालिका निवडणुकीचे वेध बऱ्याच दिवसापासून लागले आहेत. यात इच्छुकांची गुप्तपणे जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून नगराध्यक्ष ‘कोण’ यावर जोरदार चर्चा घडत आहेत.
अक्कलकोट ही ‘ब’ दर्जाची नगरपालिका तीर्थक्षेत्र असल्यामुळे कोट्यावधी रूपयाचा निधी या शहराला येत असतो. त्यामुळे नगरसेवक पदासाठी तर स्पर्धा असतेच पण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नेहमी आरपारची लढाई होते. अक्कलकोट शहराच्या पालिका निवडणुकीच्या इतिहासावर जर एक नजर टाकली तर सर्वाधिक काळ भाजपची सत्ता राहिली आहे. काही वेळा काँग्रेसनेही भाजपाला धूळ चारली आहे. यावेळी काँग्रेसकडून ज्येष्ठ नगरसेवक अशपाक बळोरगी, माजी नगराध्यक्ष महेश इंगळे, डॉ. सुवर्णा मलगोंडा यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. हे तिन्ही मंडळी मातब्बर असल्याने यापैकीच काँग्रेस उमेदवार निवडणार हे नक्की आहे.
तिन्ही उमेदवार काँग्रेसच्या दृष्टीने स्ट्रॉंग आहेत. याशिवाय अन्य चेहरा समोर येईल असे तरी सध्या वाटत नाही. बळोरगी हे अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये निष्ठेने काम करत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्ती आहेत. पक्षासोबत कायम आहेत. देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे देखील पक्ष आदेशानुसार आत्तापर्यंत काम करत आले आहेत. देशभर उलथापालथ झाली तरी त्यांची पक्षावरील निष्ठा कायम आहे. डॉ.मलगोंडा ह्या देखील नगराध्यक्ष असताना अक्कलकोट – कुरनूर जलवाहिनीचे काम केल्याने त्या शहरवासीयांच्या चांगल्या स्मरणात आहेत. त्यांच्या परिवाराला राजकीय वारसा असल्याने त्यांच्याकडे अजूनही लोक आदराने पाहतात.
भाजपकडे पाहिले तर ज्येष्ठ नेते म्हणून महेश हिंडोळे यांचे नाव आघाडीवर आहे. हिंडोळे तरुण वयापासूनच भाजपशी कनेक्टेड आहेत. त्यांची पक्षनिष्ठा विचारात घेण्यासारखी आहे. कोण कुठेही गेले तरी ते इकडे तिकडे केले नाहीत. मिलन कल्याणशेट्टी हे मागच्यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू म्हणून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. लोकमान्य गणेश मंडळाच्या माध्यमातून त्यांनी युवकांची फौज निर्माण केली आहे.
उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे हे मुरब्बी आहेत. समाज जरी अल्पसंख्यांक असला तरी त्यांची सर्वधर्मीयांशी कनेक्टिव्हिटी चांगली आहे. नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी यांच्या घराण्याला शहरात मानणारा मोठा वर्ग आहे. ते जरी सध्या भाजपमध्ये असले तरी ते पक्षाअंतर्गत गटबाजीमुळे ते प्रचंड नाराज आहेत. त्यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यावेळी चांगले उमेदवार देणार असून त्यांचीही या निवडणुकीत यश मिळवण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या उमेदवाराबाबत अजूनही फारशी चर्चा नाही. रिपाई, रासप सध्यातरी भाजपा बरोबर काम करत आहेत. त्यांची भूमिका याबाबतीत अजून ठरलेली नाही. त्यांच्या भूमिकेवरील बरेच काही अवलंबून आहे.
रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे,राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर हे लवकरच आपली भूमिका जाहीर करणार आहेत. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अद्याप जाहीर न झाल्याने विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी उमेदवाराबाबत अद्याप कुठेही वाच्यता केली नाही. परंतु त्यांचे उमेदवार मनात ठरले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी कामाला लागण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या आहेत. घोषणा औपचारिकपणे बाकी आहे.उमेदवार निवडीवेळी नाराजीचा सूर नको म्हणून दोघांनी गुप्तता पाळली आहे. त्यातच वरचेवर निवडणुका पुढे जात असल्याने उमेदवार निवडीबाबत उत्कंठा शहरवासींमध्ये शिगेला पोहचली आहे.
महाविकास आघाडीत नवचैतन्य
राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे. देशात अनेक ठिकाणी भाजपचा बोलबाला असताना या निवडणुकीत महाविकास आघाडीने यश संपादन केल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा आहे.