ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खत, बियाणांची उपलब्धता सुलभ व्हावी – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकाचे क्षेत्र वाढले आहे. ३ लाख हेक्टरहुन अधिक क्षेत्र खरीप पिकाखाली येते. त्यानुषंगाने येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाणे यांची उलब्धता सुलभ व्हावी. सर्वच तालुक्यात योग्य दराने विक्री होण्यासाठी संबंधित विभागास सूचना द्यावी असे खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सूचना केल्या.

खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेत खरिप हंगाम नियोजनाबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांना योग्य दारातच गुणवत्तापूर्ण खते, बी-बियाणे मिळावीत. गतवर्षी शेतकऱ्यांनी खरेदी केलेले महाबीजचे बियाणे मोठ्या प्रमाणात उगविले नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसल्याने याची यंदा काळजी घ्यावी. खरीप हंगाम क्षेत्र जिल्ह्यात अधिक वाढल्याने रासायनिक खतांची व बी बियाणांची मागणी अधिक आहे. परंतु सध्या डी ए पी, युरिया सह इतर रासायनिक खते व बियाणे यांची उपलब्धता कमी असून शेतकऱ्यांना वाजवी दरात खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे त्यांची मागणी करून योग्य दरात विक्री करण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे याबाबत खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सूचना केल्या.

तीन लाख हेक्टर हून अधिक क्षेत्र खरीप पिकांच्या लागवडीखाली येत आहे. यामुळे महाबीज सह इतर बियाणे व रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. याचाच परिणाम म्हणून अधिक दराने विक्री होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने याबाबत दक्ष राहावे असे खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले.

तसेच खरीपपूर्व पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सुलभपणे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात. यंदा, शेतकऱ्यांना सर्व सुविधा सुलभ उपलब्ध व्हाव्यात, असे खा. डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!