ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गावाच्या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण, पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर,दि.15: रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते तर काही भाज्या मधुमेह, हृदयविकारावरही उपयुक्त आहेत. निसर्गाच्या कुशीत लपलेल्या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

शासनाच्या कृषी विभागामार्फत या महोत्सवाचे आयोजन शासकीय मैदान नेहरूनगर सोलापूर येथे करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सोनाली कडते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आत्माचे उपसंचालक मदन मुकणे आदी उपस्थित होते.

श्री. भरणे म्हणाले, शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी महोत्सवात सहभागी होऊन भाज्यांचे महत्त्व जाणून घ्यावे. कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. रानभाज्या आयुर्वेदिक औषधाचे काम करतात. जिल्ह्यातील कोरोना सध्या नियंत्रणात आला आहे. या महोत्सवातून रानभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महोत्सवात विविध 40 प्रकारच्या रानभाज्यांच्या स्टॉलची मांडणी करण्यात आली होती. स्टॉलधारकांनी विविध रानभाज्यांचे महत्व सांगितले. यावेळी रानभाज्या महोत्सवात सहभाग घेतलेल्या स्टॉलधारकांचा सत्कार पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!