फुटबॉल फॉर स्कूल उपक्रम; राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
ठाणे : राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.
फिफाच्या १७ वर्षाखालील महिला वर्ड कप स्पर्धेच्याच्या निमित्ताने आयोजित फुटबॉल फॉर स्कुल उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय क्रीडा व युवक राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक, फिफाचे अध्यक्ष जीयानी इंफॅन्टिनो, भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष कल्याण चौबे, महासचिव शाजी प्रभाकरन, फिफा फुटबॉल फॉर स्कूलच्या फातिमाता सीडबी, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते. भारतीय फुटबॉल फेडरेशन, केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांच्या सहयोगाने नवी मुंबईतील नेरुळमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फुटबॉल फॉर स्कूल या उपक्रमासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय व फिफा संघटनेमध्ये सामंजस्य करार यावेळी झाला. स्थानिक महापालिका शाळेतील विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
श्री. केसरकर म्हणाले की, फुटबॉल खेळामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मदत होते. शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता वाढ होण्यासही मदत होते. राज्यातील शाळांमध्ये २५ लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांपर्यंत फुटबॉल पोचविण्यात येईल.
२५ लाख विद्यार्थ्यांना फुटबॉल चे प्रशिक्षण देणार – धर्मेंद्र प्रधान
केंद्रीय मंत्री श्री. प्रधान म्हणाले की, खेळाचा समावेश मुख्य अभ्यासक्रमात व्हायला हवा यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. देशातील २५ लाख विद्यार्थ्यांना फुटबॉल प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
देशातील प्रत्येक गावागावात फुटबॉल खेळ पोहचविण्यात येणार आहे. यासाठी नवोदय विद्यालय संघटनेचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
फुटबॉल फॉर स्कूल उपक्रम
शाळांसाठी फुटबॉल (फुटबॉल फॉर स्कूल) हा फिफा द्वारे युनेस्कोच्या सहकार्याने चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. ज्याचे उद्दिष्ट सुमारे ७०० दशलक्ष मुलांच्या शिक्षण, विकास आणि सक्षमीकरणासाठी योगदान देणे आहे. फुटबॉल हा खेळ अधिकाधिक मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेमध्ये फुटबॉल क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साधण्यासाठी फुटबॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्ये विकसित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.