ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरेंच्या उपस्थितीविना बैठक ; एकनाथ शिंदेना गटाचे प्रमुखपद बहाल

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व चिन्ह एकनाथ शिंदे यांना प्रदान केल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरेंच्या उपस्थितीविना ही बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदेना गटाचे प्रमुखपद बहाल करून त्यांना सर्वाधिकार प्रदान करण्यात आले.

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ठाकरे कुटुंबियांशिवाय पार पडली. या बैठकीत सुरूवातीलाच काही महत्त्वाचे ठराव पास करण्यात आले. ज्यात शिवसेनेने पुन्हा एकदा भूमिपूत्रांच्या नोकऱ्यांबाबतचा ठराव संमत करून घेतला आहे.

राज्यातील भूमीपूत्रांना ८०% नोकरी देणे. सर्व प्रकल्पात भूमीपूत्रांना ८० टक्के नोकरीमध्ये स्थान, मराठी भाषेला अभीजात भाषेचा दर्जा, चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देणे, स्वातंत्र्यवीर सावकरकरांना “भारतरत्न” देणे, संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींना पाठिंबा देणे, असे अनेक ठराव काल मुंबईत पार पडलेल्या कार्यकरणीच्या बैठकीत घेण्यात आले.

खरी शिवसेना कुणाची यावर गेल्या काही महिन्यांपासून असणारा पडदा निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात हटवून शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना प्रदान केले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली.

शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदे यांना मुख्य नेतेपदी कायम ठेवण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. तसंच शिवसेनेचे सर्व अधिकार मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. या बैठकीत शिवसेनेच्या संसदीय दलांच्या नेत्यांची घोषणा करण्यात येणार आहे. गजानन किर्तीकर यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली जाणार आहे, तर लोकसभा गट नेते म्हणून राहुल शेवाळे असणार आहेत. १९९८ साली बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार कार्यकारिणी स्थापन होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!