मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर संजय राठोड यांनी रविवारी आपल्याकडे असलेल्या वनमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपावला होता. मात्र, राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलाच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं राठोड यांच्या राजीनाम्याचे पुढे काय झालं?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
भाजपने शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता तसेच, भाजपचे नेते अतुल भातख़ळकर आणि प्रविण दरेकर यांनी संजय राठोड यांच्या राजीनामा घेतल्या शिवाय अधिवेशन चालू न देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.
वनमंत्री राठोड यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेत राजीनामा सोपवला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी राजीनामा फ्रेम करुन लावण्यासाठी घेतलेला नाही, असं भाजपने सांगितलं होतं. मात्र, राजीनामा घेऊन तीन दिवस उलटले तरीही वनमंत्री राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नाही. त्यामुळं कायद्यानुसार मंत्रिपदी अजूनही राठोड यांच्याकडे कायम आहेत, अशी चर्चा सुरु आहे.