औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील पेंढापूर आणि दहेगांवमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. गेल्या १५ दिवसांपासून मराठवाड्यात परतीच्या पावसानं कहर केला आहे. त्यामुळं अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाली आहे. पिकांची पाहणी केल्यानंतर ठाकरें यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मराठवाड्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी दहेगांव आणि पेंढापूर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ठाकरे म्हणाले की, संकटं येत असतात, परंतु त्याच्याशी आपल्याला लढायचं आहे. तुमचं नुकसान झालेलं असलं तरी तुम्ही धीर सोडू नका, आपण सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी गंगापूर तालुक्यासह जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.