मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. काल दिवसभर सक्तवसुली संचलनालय (ईडी) कडून त्यांच्या नागपूर व मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, आज ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने अनिल देशमुख यांना शनिवारी सकाळी 11 वाजता कार्यालयात हजर होण्यास सांगितले आहे.
100 कोटी वसुली प्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांच्या भोवती तपासाचा धडाका लावला आहे. शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी ईडीतर्फे छापेमारी करण्यात आली. सकाळी 8 वाजेच्या सुमारास ईडीचे पथक देशमुखांच्या घरी दाखल झाले होते. ही चौकशी सुमारे नऊ तास चालली होती. या पथकामध्ये एक महिला अधिकाऱ्यासह पाच जणांचा समावेश होता.
शुक्रवारी दिवसभर चाललेल्या चौकशीत अनिल देशमुख यांची पत्नी, मुलगा सलील आणि त्यांची सून या सर्वांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस केली. यावेळी ईडीच्या कारवाईला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे देशमुख यांनी म्हटलं होतं. शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या वरळीतल्या सुखदा सोसायटीतल्या घरामध्ये तब्बल साडे अकरा तास ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरु होते. दरम्यान या सर्च ऑपरेशन वेळी स्वतः अनिल देशमुख घरी उपस्थित होते.