दिवाळीपूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी, महसूलमंत्र्यांची सकारात्मकता ; जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ कळवणार
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१७ : संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.सर्व पिकांचे पंचनामे झाल्यानंतर तालुक्याला अतिवृष्टीचा निधी मिळाला आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पिकांच्या जोखमेपोटी हप्ता भरला आहे. प्रशासनाकडून अक्कलकोट तालुक्यातील फक्त तीन मंडळातील भुईमूग पिकासाठी विमा कंपन्यांनी ॲग्रिम रक्कम द्यावी असे आदेश दिले असून ही बाब चुकीची असून तालुक्यातील सर्व मंडलातील विमाधारक शेतकऱ्यांना खरीपातील सर्व पिकांच्या जोखमेपोटी विमा कंपनीकडून दिवाळीपूर्वी ॲग्रिम रक्कम देण्याविषयी आदेश द्यावेत अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली.
याविषयी बोलताना सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, अक्कलकोट तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे अर्थकारण खरीप पिकांवर अवलंबून आहे. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील खरीप हंगामातील सोयाबीन,तूर,भुईमूग,उडीद,मूग यासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अडचणीतील शेतकऱ्यांना एनडीआरएफ योजनेतून अतिवृष्टीचा निधी मिळाला आहे. यावरून तालुक्यात झालेल्या नुकसानीची स्पष्टता दिसून येत आहे.दिवाळीपूर्वीच शेतकरी अडचणीत आले आहेत.
मात्र जिल्हा कृषी कार्यालयाकडुन जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने अक्कलकोट तालुक्यातील फक्त मैंदर्गी,वागदरी व अक्कलकोट महसूल मंडलातील भुईमूग पिकासाठी विमा कंपन्यांनी ॲग्रिम स्वरूपात रक्कम देण्याविषयी आदेश देण्यात आले आहेत.वास्तवात संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात मोठे नुकसान झाल्याने खरीपातील सर्व पिकांच्या जोखमेपोटी विमा कंपनीकडून दिवाळीपूर्वी ॲग्रिम स्वरूपात रक्कम देण्याविषयी आदेश द्यावेत यासाठी महसूलमंत्र्यांकडे निवेदन दिल्याचे सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले.यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले उपस्थित होते.
महसूलमंत्री ॲक्शन मोडवर
अक्कलकोट तालुक्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याची ॲग्रीम रक्कम मिळावी यासाठी सिद्धाराम म्हेत्रे यांनी निवेदन दिल्यानंतर लागलीच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना याबाबत तातडीने संपर्क साधणार असल्याचे स्पष्ट केले. दिवाळीपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.