अक्कलकोट, दि.१८ :सध्या जिल्ह्यात उजनीचे पाणी आणि वाढत्या कोरोनाचा विषय चर्चेत आहे.या दोन्ही गोष्टी हाताळण्यात सोलापूरच्या पालकमंत्र्यांना अपयश आले आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस समाधान होटकर यांनी केली आहे.
कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याची सद्यस्थिती पाहता कोरोना रुग्णांची सरासरी महाराष्ट्रात दुसर्या क्रमांकावर आहे.दिवसेंदिवस स्थिती नाजूक होत चालली आहे.या परिस्थितीत सक्षम स्थानिक नेतृत्वाची नितांत गरज आहे. विद्यमान पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बद्दल सर्व पक्षातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्याशिवाय उजनीचे सोलापूरच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला पळवून नेत आहेत त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर आहे.याचा फटका महाविकास आघाडीतील घटकांना देखील बसत आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री पदावर नियुक्त केल्यास सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.तसेच त्या अभ्यासू देखील
आहेत.या माध्यमातून काँग्रेस पक्षाला जिल्हास्तरावर पक्ष वाढण्यास मदत होणार आहे.महाविकास आघाडीचे सरकार असूनही काँग्रेस पक्षात नाराजीचे वातावरण आहे.
आमदार प्रणिती शिंदे ह्या आपल्या मतदार संघात सध्या कोरोना परिस्थिती योग्य हाताळत आहेत. त्यामुळे त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री करावे,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली असल्याचे होटकर यांनी सांगितले.