गुरुशांत माशाळ
दुधनी
दि. ०४ ऑगस्ट : देशात कोरोनाचा तिसरी लाट येण्या पूर्वीच कर्नाटक सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांकडून मागील ७२ तासंपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर टेस्टिंग रिपोर्टची मागणी केली जात आहे.
मागील तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्यामध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे एक किंवा दोन डोस घेतले असले तरी त्यांच्याकडे ७२ तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणी अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे सीमावर्ती भागातील वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ज्याठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले त्या ठिकाणी कोरोना चाचणी करण्याची व्यवस्था कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांनी सोय करावी अशी मागणी प्रवाश्यांमधून व्यक्त होत आहे.
यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जायचे असल्यास ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर टेस्टिंगचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे कर्नाटक सरकारकडून पुन्हा एकदा बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रकारचे आदेश गुलबर्ग्याचे जिल्हाधिकारी व्ही. व्ही. जोत्सना यांनी काढला आहे. मागील दोन-तीन दिवसापासून याची कडक अंमलबजावणी देखील केली जात आहे. यामुळे रोज महाराष्ट्रातून-कर्नाटकात जाण्यासाठी सिमेवर आलेल्या वाहन धारकांना आल्या वाटे परत जावे लागत आहे.
मागील वर्षापासून दुधनी जवळील सिन्नुर गावच्या सिमेजवळ कर्नाटक आरोग्य विभाग आणि पोलिसांच्यावतीने चेकिंग पोस्ट उभारण्यात आले आहे. नाकाबंदी ठिकाणी महाराष्ट्रातून- कर्नाटक व कर्नाटकातून- महाराष्ट्रात ये-जा करण्यासाठी ७२ तासांच्या आतील कोरोना रिपोर्ट निगेटिव असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे रोज दोन्ही राज्यातून शेकडो वाहने परत जात आहेत. यावरुन या ठिकाणी काहीवेळा वाद-विवाद देखील झाले आहेत. याठिकाणी कर्नाटक शासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आले असले तरी चिरी-मिरी घेऊन वाहने सोडले जात आहे असे नागरिकांमधून सांगण्यात आले.
कर्नाटकातून महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात कर्नाटकच्या बस सोडले जात आहेत. त्यामधून अनेक प्रवासी प्रवास करून महाराष्ट्रात प्रवेश करीत आहेत. मात्र त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा चौकशी केली जात नाही. फक्त महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसेस, चारचाकी वाहनांनमधून (कार,जीप, ट्रॅक्टर) जाणाऱ्या प्रवाश्यांना अडवून आरटीपीसीआर टेस्टिंग रिपोर्टची मागणी केली जात आहे. कर्नाटकच्या बसमधुन प्रवास केल्यास कोरोना होत नाही का? त्यांच्या बसमधून कोरोना पसरत नाही का? फक्त खासगी वाहनातून प्रवास केल्यावरच कोरोना होतो का? असे अनेक प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिक विचारत आहेत.