ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

 

अक्कलकोट, दि.१४ : गोकुळ शुगरचे
चेअरमन दत्ता शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून येत्या १६ एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.रविवारी, सोलापुरात शांतीसागर कार्यालयात जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये आमदार सुभाष देशमुख,भाजप नेते किशोर देशपांडे,माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख,शहराध्यक्ष नरेंद्र काळे
यांची पक्षप्रवेशासंदर्भात बैठक पार पडली.या बैठकीमध्ये निर्णय झाला असून शिंदे यांच्या पक्षप्रवाशाने अक्कलकोट तालुक्यात भाजपची ताकद वाढणार आहे. भाजपची देशामधील ताकद पाहून एक तरुण युवा नेता आणि अभ्यासू कारखानदार आपल्या पक्षामध्ये येत असल्याने त्यांचे आम्ही पक्षामध्ये स्वागत करत आहोत, अशी प्रतिक्रिया उपस्थित नेते
मंडळींनी दिली.महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपमुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूरला येणार आहेत.त्यावेळी हा पक्ष प्रवेश ठरला आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती वेगाने होत आहे.केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही.त्यांच्या नेतृत्वाखाली शहरासह ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होत आहे. अक्कलकोट तालुक्यात आमदार
सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागातील रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. भाजपमुळे विकासाची गंगा तालुक्यात वाहत आहे. त्यामुळे आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे,असे गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.शिंदे हे मूळचे दहिटणे (ता.अक्कलकोट) येथील असून त्यांचे
वडील बलभीम शिंदे हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष होते.ते आजतागायत भाजपमध्येच आहेत.आमदार सुभाष देशमुख आणि प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या खासदारकीच्या काळामध्ये शिंदे हे अतिशय सक्रिय होते.त्यांचा परिवार
तसा पूर्वीपासूनच भाजपशी संबंधित आहे.शिंदे यांचा कारखानदारीमध्ये मोठा अनुभव आहे. शेतकऱ्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे त्यांच्या या संपर्काचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला होणार आहे.

काँग्रेसला जे जमले नाही
ते दहा वर्षात भाजपने केले

काँग्रेसने जे चाळीस वर्षात केले नाही ते भाजपने दहा वर्षात केले.भाजपमुळे देशाचा विकास होत आहे.जगात नावलौकिक
होत आहे.म्हणून आपण राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप
पक्ष प्रवेश करत आहोत.

दत्ता शिंदे,चेअरमन गोकुळ शुगर

 

योग्य तो सन्मान व
प्रतिष्ठा दिली जाईल

रविवारी पक्षाच्या झालेल्या बैठकीमध्ये दत्ता शिंदे यांच्या पक्षप्रवेशाबाबत अंतिम निर्णय झालेला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होईल. त्यांचे आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो.त्यांना योग्य तो सन्मान व प्रतिष्ठा दिली जाईल.

सचिन कल्याणशेट्टी,जिल्हाध्यक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!